मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा पांडुरंगाचा पालखी सोहळा यावर्षी ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. राम मंदिर ते वडाळा विठ्ठल मंदिर या दरम्यान होणा-या या पालखी सोहळ्याच्या आयोजनाची बैठक श्री वारकरी प्रबोधन महा समितीचे अध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी राम मंदिर कॉटन ग्रीन येथे पार पडली.
श्री वारकरी प्रबोधन समितीच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यादरम्यान जे उपक्रम होतात ते सर्व उपक्रम या पालखी सोहळ्यात होतात. ज्यांना आषाढी वारीमध्ये सहभागी होता येत नाही ते सर्व वारकरी मुंबईतील पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. सात दिवस कीर्तन महोत्सव, संत संमेलन, घोड्याचे गोल रिंगण आणि पालखी सोहळा असे या संमेलनाचे स्वरूप असते.
यावर्षी होणा-या कीर्तन महोत्सवात दिपाली झुमके (कल्याण),महादेव महाराज मोरे (घाटकोपर), सुप्रिया साठे (आळंदी), केशव महाराज भागडे (इगतपुरी), डॉ. विवेक महाराज चव्हाण (आळंदी), महेंद्र महाराज भगवान गडकर, रामेश्वर महाराज शास्त्री, सुजाता महाराज गोपाळे आदी कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. या बैठकीला उपाध्यक्ष अशोक महाराज सूर्यवंशी, सचिव राजाराम उर्फ नाना निकम, सहसचिव शामसुंदर महाराज सोन्नर, खजिनदार बळवंत महाराज आवटे, विश्वस्त बाबासाहेब महाराज मिसाळ, दीपक शिंदे उपस्थित होते. या बैठकीमध्ये यावर्षीच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पांडुरंगाच्या पालखी सोहळ्यात संत संमेलन होते. यावेळी वारकरी संप्रदायातील वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध वारकरी प्रबोधनकारांना वारकरी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. तर वारकरी संप्रदायाची अविरत सेवा करणा-या ज्येष्ठ प्रबोधनकाराला हैबत बाबा वारकरी सेवा पुरस्काराने गौरविण्यात येते. तर दरवर्षी दिंडीमध्ये सहभागी होणा-या दिंड्यामधील तीन आदर्श दिंड्याना पुरस्कार दिला जातो. या सोहळ्यात दैनिक 'सामना'च्या वतीनेही समाजप्रबोधन पुरस्कार दिला जातो. त्यावरही या बैठकीत चर्चा झाली.