Tuesday, December 9, 2025

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. त्यापैकी २४० भारतीय तर ११० विदेशी खेळाडू आहेत. नुकताच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा मैदानात उतरलेला दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉक आणि दीर्घ विश्रांतीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करू पाहणारा ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ यांचा या यादीत समावेश आहे. स्मिथ शेवटचा आयपीएलमध्ये २०२१ मध्ये दिसला होता.

आयपीएलच्या माहितीनुसार, यंदा एकूण १३९० खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती. त्यातील छाननी करून अंतिम ३५० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आयपीएलमधील दहा फ्रँचायझी या ३५० खेळाडूंपैकी एकूण ७७ रिक्त जागांसाठी बोली लावणार आहेत.

पृथ्वी शॉ आणि सरफराज खान पहिल्या सेटमध्ये

पहिल्या सेटमध्ये भारताचे पृथ्वी शॉ आणि मुंबईचा सरफराज खान या दोघांचा समावेश आहे. दोघांचीही मूळ किंमत ७५ लाख रुपये ठेवली आहे. पृथ्वीने २०१८ ते २०२४ दरम्यान आयपीएलमध्ये सातत्याने खेळले, मात्र गेल्या वर्षी त्याला कुणीही खरेदी केले नव्हते. सरफराज २०२१ नंतर आयपीएलमध्ये दिसले नाहीत. पहिल्याच सेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे कॅमरन ग्रीन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलरही असणार असून, या सर्वांची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे.

केकेआर आणि सीएसकेकडे सर्वाधिक रक्कम

कोलकाता नाईट रायडर्सने रिलीज केलेल्या ऑलराउंडर वेंकटेश अय्यरची मूळ किंमतही २ कोटी रुपये आहे. सय्यद मुश्ताक अली टी–२० स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे कुणाल चंदेला आणि अशोक कुमार यांचाही अंतिम यादीत समावेश आहे. केकेआरकडे लिलावात सर्वाधिक म्हणजे ६४.३ कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यानंतर ४३.४ कोटींसह चेन्नई सुपर किंग्सचा क्रमांक लागतो. सनरायझर्स हैदराबादकडे २५.५ कोटी आहेत.

अंतिम यादीत इंग्लंडचे २१ तर ऑस्ट्रेलियाचे १९ खेळाडू

अंतिम यादीत इंग्लंडचे २१ खेळाडू असून, त्यात जेमी स्मिथ, गस एटकिंसन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि टेस्ट ओपनर बेन डकेट यांचा समावेश आहे. कॅमरन ग्रीनवर मोठी बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑस्ट्रेलियाचे एकूण १९ खेळाडू यात असून, जोश इंग्लिस, मॅथ्यू शॉर्ट, कूपर कोनोली आणि ब्यू वेबस्टर यांची नावे विशेष आहेत.

दक्षिण आफ्रिकेचे १५ खेळाडू लिलावासाठी पात्र ठरले आहेत. डी कॉक, मिलर, एनरिख नॉर्किया, लुंगी एनगिडी, गेराल्ड कोएट्झी आणि वियान मुल्डर ही प्रमुख नावे आहेत. वेस्ट इंडिजचे ९, श्रीलंकेचे १२, न्यूजीलंडचे १६ आणि अफगाणिस्तानचे १० खेळाडू यादीत समाविष्ट आहेत. न्यूजीलंडचा तरुण स्टार रचिन रवींद्रही यात असून, चेन्नई सुपर किंग्सने त्याला यंदा रिलीज केले होते. अफगाणिस्तानच्या खेळाडूंमध्ये रहमानुल्लाह गुरबाज आणि नवीन–उल–हक यांची नावे महत्त्वाची मानली जात आहेत.

Comments
Add Comment