कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात एकीकडे भारताचे फलंदाज एकामागोमाग बाद होत असताना, हार्दिक पांड्याने एकहाती किल्ला लढवत धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले. हार्दिकच्या या आक्रमक आणि झुंजार खेळीमुळे भारतीय डावाला आधार मिळाला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा भारताला ६ बाद १७५ धावा करता आल्या. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात मंगळवारी कटकमधील बाराबाती स्टेडियमवर टी- २० मालिकेतील पहिला सामना झाला. या सामन्यात भारताच्या वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाज मोठ्या खेळी करण्यात अपयशी ठरले. पण हार्दिक पांड्याने केलेल्या आक्रमणामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर १७६ धावांचे लक्ष्य ठेवता आले.
भारताकडून अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी सलामीला फलंदाजी केली. मात्र भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. उपकर्णधार गिल तिसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्याला लुंगी एनगिडीने मार्को यान्सिनच्या हातून ४ धावांवर झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला होता. त्याने सुरुवात चांगली केली होती. त्याने तिसऱ्या षटकात चौकार आणि षटकार मारला. पण त्यानंतर या चौथ्या चेंडूवर सूर्यकुमारलाही लुंगी एनगिडीनेच एडेन मार्करमच्या हातून झेलबाद केले. सूर्यकुमारने ११ चेंडूत १२ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मासह तिलक वर्माने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण अभिषेकचा मोठा अडथळाही लुथो सिपामालाने दूर केला. त्याला १२ चेंडूत १७ चेंडूत त्याने मार्को यान्सिनच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे भारताची अवस्था ४८ धावांवर ३ विकेट्स अशी झाली. नंतर तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांनी ३० धावांची भागीदारी करत संघाला ७० धावांचा टप्पा पार करून दिला. पण तिलकही १२ व्या षटकात बाद झाला. त्यालाही लुंगी एनगिडीनेच बाद केले आणि झेलही मार्को यान्सिनने घेतला. तिलकने ३२ चेंडूत २६ धावा केल्या. त्याच्यानंतर हार्दिक पांड्याने फलंदाजीला येताच आक्रमक शॉट्स खेळत इरादा स्पष्ट केला. मात्र दुसऱ्या बाजूने अश्रक पटेल २१ चेंडूत २३ धावा करून बाद झाला, तर शिवम दुबेही ९ चेंडूत ११ धावांवर बाद झाला. मात्र या विकेट्स जात असतानाही दुसऱ्या बाजूने हार्दिक पांड्या दमदार फलंदाजी करत होता. त्याने त्याच्या आक्रमक फलंदाजीसह संघाला १५० धावांचा टप्पा पार करून दिला.
हार्दिकने २० व्या षटकात षटकारासह २५ चेंडूत त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. यासोबतच त्याचे टी२० कारकिर्दीत १०० षटकारही पूर्ण झाले. त्याच्या खेळीमुळे भारताने २० षटकात ६ बाद १७५ धावा करता आल्या. हार्दिक २८ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ५९ धावांवर नाबाद राहिला. जितेश शर्मा ५ चेंडूत १० धावांवर नाबाद राहिला. गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. लुथो सिपामलाने २ विकेट्स घेतल्या, तर डेनोवन फरेराने १ विकेट घेतली.
सूर्या ठरला अनलकी!
कटकच्या मैदानातील पहिल्या टी-२० सामन्यात नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा भारताच्या विरोधात लागला. वनडेत के.ले राहुलने टॉस उंचावताना डाव्या हाताचा फंडा आजमावला होता. सूर्यानंही त्याची कॉपी केली. पण त्याचे नशीब काही बदलले नाही. सूर्यकुमार यादवसमोर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमन नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
संजूसह कुलदीप, हर्षित राणाही बाकावर
टॉस गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आल्यावर सूर्यकुमार यादवनं कोणत्या रणनितीसह मैदानात उतरणार हे सांगताना प्लेइंग इलेव्हनम सांगण्याऐवजी बाहेर बसवण्यात आलेल्या मंडळींची नावे घेतली. संजू सॅमसन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांच्याशिवाय संघ मैदानात उतरणार असल्याचे तो म्हणाला.






