प्रभाग क्रमांक १९२मध्ये भाजपाला सुटला तरी उमेदवारीवरून जोरदार स्पर्धा
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची भाऊगर्दी सुरु झाली आहे. इच्छुकांमध्ये स्पर्धा वाढत असल्याने आता पक्षांतर्गतच गटतटाचे वातावरण निर्माण होत असल्याचे पहायला मिळत आहे. माहिम विधानसभेतील प्रभाग क्रमांक १९२ हा मतदार संघ सर्वसाधारण अर्थात खुला झाल्याने या जागेवर भाजपाने दावा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रभागात भाजपामध्येच उमेदवारी मिळवण्यावरून मोठी चढाओढ दिसून येत आहे. या प्रभागात भाजपात जितू विरुध जितू अशी स्पर्धा दिसून येत आहे.
माहिम प्रभाग क्रमांक १९२ हा खुला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. या प्रभागातून उबाठा शिवसेनेच्या नगरसेविका प्रिती पाटणकर या निवडून आलेल्या आहेत. परंतु ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये हा प्रभाग मनसेला सोडला जाण्याची शक्यता आहे, तर भाजपा आणि शिवसेनेच्या युतीमध्ये हा प्रभाग भाजपाला सोडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेकडून स्नेहल जाधव, यशवंत किल्लेदार, उबाठाकडून साईनाथ दुर्गे, प्रिती पाटणकर, प्रकाश पाटणकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेनेकडून कुणाल वाडेकर, तर भाजपाकडून जितेंद्र राऊत, अक्षता तेंडुलकर, जितेंद्र कांबळे, सचिन शिंदे, विवेक भाटकर यांच्या नावाची चर्चा आहे.
परिसर अस्वच्छ करणाऱ्या ७८५ जणांवर कारवाई, सुमारे १२ लाखांचा दंड वसूल मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील वायू निर्देशांक नियंत्रणात आणण्यासाठी ...
परंतु ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला हा प्रभाग सुटू शकतो, त्यामुळे मनसेमध्ये माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि यशवंत जाधव यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. तर महायुतीत ही जागा भाजपाला सोडली गेल्यास जितेंद्र राऊत, अक्षता तेंडुलकर आणि जितेंद्र कांबळे यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. जितेंद्र राऊत हे भाजपाचे माजी मुंबई अध्यक्ष आणि मंत्री ऍड आशिष शेलार यांच्या विश्वासातील आहेत. तसेच श्री सिध्दीविनायक न्यास समितीवर सदस्य आहेत. तर जितेंद्र कांबळे वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांचे विश्वासू आहेत. वडाळा विधानसभेचे १८ मतदार केेंद्र या प्रभाग १९२मध्ये येत असल्याने जितेंद्र कांबळे यांनी या प्रभागातून निवडणूक लढण्याचा विचार केला आहे. मात्र, जितेंद्र कांबळे यांच्यापेक्षा जितेंद्र राऊत हे अधिक प्रभावशाली असले तरी आशिष शेलार यांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे. आशिष शेलार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, संपूर्ण दादरमध्ये भाजपाच्या या दोन्ही इच्छुक उमेदवारांची जोरदार चर्चा सुुरु असून कोणत्या जितूच्या पारड्यात ही उमेदवारी जाते की अन्य कुणी बाजी मारु जातो याकडे दादरकरांचे लक्ष आहे.





