नागपूर : "गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, कायद्यातील तरतुदींनुसार “हार्म आणि हर्ट” या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल", अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाविद्यालय परिसरातील अवैध गुटखा विक्रीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. गुजरात आणि राजस्थान येथून ट्रक, टेम्पो किंवा कंटेनरच्या माध्यमातून भाजीपाला, तेल, किराणामाल किंवा फळांच्या आड लपवून नवी मुंबई परिसरातील विक्रेत्यांपर्यंत गुटखा पोहोचवला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. अशा प्रकारे गुटखा विक्री करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लावणार का? असा प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला.
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शाळा किंवा महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात गुटखा विक्रीचे प्रकार आढळल्यास त्या परिसरातील टपऱ्या किंवा दुकानांवर संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने केली जाणार आहे. तसेच ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्रांची आवश्यकता आहे. मुंबई महानगरमध्ये दर्जेदार पुनर्वसन केंद्रांची कमतरता असून शासन यासंदर्भात आवश्यक पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्याच्या ...
आतापर्यंत किती ठिकाणी कारवाई झाली?
राज्यात गुटखा बंदी आहे. गुटखा विक्री व वहन संदर्भात राज्यभरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून विविध जिल्ह्यांमध्ये एकूण शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली आहे. यात नवी मुंबईत १ हजार १४४, अहिल्यानगर येथे १८५, जालना ९०, अकोला ३५, नाशिक १३१, चंद्रपूर २३०, सोलापूर १०८, बुलढाणा ६६४, तसेच नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत १ हजार ७०६ गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांमी दिली.
शाळा-महाविद्यालय परिसरातील टपऱ्या उद्ध्वस्त करणार - गृहराज्यमंत्री पंकज भोयर
गुटखा विक्रीवर बंदी असतानासुद्धा काही ठिकाणी अवैध पद्धतीने गुटखा विक्री होते. यावर संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: यासंदर्भातील आढावा घेतला असून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटरच्या परिसरातील टपऱ्या किंवा दुकाने उद्ध्वस्त करण्याकरिता त्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. तसेच याबाबत लोकप्रतिनिधींना माहिती देण्याकरिता तातडीने पोलिस आयुक्तांना निर्देश देऊन ती माहिती देण्यात येईल. लवकरात लवकर सर्व लोकप्रतिनिधींना याबाबतची माहिती देण्यात येईल", अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.





