नागपूर : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाजवळ लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. ते म्हणाले की, मुंबई येथील रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा, अशी मागणी यापूर्वीच्या अधिवेशनात आमदारांनी केली होती. याविषयी रेल्वे मंत्र्यांनी स्वतः मला पुतळा कुठे असेल, कसा असेल याचे सादरीकरण करून दाखवले. रेल्वे मंत्र्यांनी सांगितले होते की, राज्यमंत्र्यांनी लोकसभेत याविषयीच्या प्रश्नावर दिलेले उत्तर जुन्या आराखड्याच्यानुसार होते. आता नव्या आराखड्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात येणार आहे. त्यानुसार त्या नव्या आराखड्याची अंतिम मान्यता घेण्यात येत आहे. नवीन आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर मुंबई रेल्वे स्थानकावर भव्य पुतळा उभा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.