पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय लीग्स, कठोर निवड निकष आणि देशभरातील चाहत्यांचे निखळ प्रेम या सर्वामुळेच भारतीय क्रिकेटने जागतिक स्तरावर भक्कम अस्तित्व निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत क्रिकेट व्यवस्थेलाही तितक्याच पारदर्शकतेची आणि शिस्तबद्धतेची अपेक्षा असते. तथापि, पुद्दुचेरीमध्ये मात्र याच्या विपरीत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
पुद्दुचेरी क्रिकेटमधील गंभीर घोटाळा उघडकी आला आहे. या तपासणीत पुद्दुचेरी क्रिकेट असोसिएशनमध्ये खोट्या कागदपत्रांचा, रहिवासी पुराव्यांचा आणि बनावट आधार कार्डांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केल्याचे आढळले आहे. स्थानिक खेळाडूंची संधी हिसकावून बाहेरील राज्यांतील खेळाडूंना संघात समाविष्ट करण्यासाठी एक यंत्रणा सक्रीय असल्याचे निष्पन्न झाले आहे.
उघड झालेल्या माहितीमध्ये अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे किमान १२ खेळाडू एकाच पत्त्यावर नोंदणीकृत असल्याचे आढळले. हा पत्ता वास्तविक नसून बनावट असल्याचे संकेत तपासणीत मिळाले. या बनावट पत्त्याच्या आधारावर आधार कार्डे तयार करून खेळाडूंना पुद्दुचेरीचा रहिवासी म्हणून दाखवले जात होते. या माध्यमातून बाहेरच्या प्रांतातील खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये पुद्दुचेरीकडून खेळण्याचा मार्ग खुला केला जात होता.
या प्रकारामुळे पुद्दुचेरीतील स्थानिक खेळाडू पूर्णपणे पाठीमागे ढकलले जात आहेत. निवड प्रक्रियेतील पारदर्शकता धुळीस मिळून बाहेरच्या खेळाडूंची गर्दी वाढत असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक कुटुंबे, प्रशिक्षक आणि क्रिकेटप्रेमींमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.






