पंचायत समिती २१ बंधारे, कृषी कार्यालय बांधणार ५०
शैलेश पालकर पोलादपूर : उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असल्याचा पूर्वानुभव लक्षात घेता पंचायत समितीने ग्रामपंचायतींमार्फत २१ वनराई बंधारे बांधले असून तालुका कृषी विभागातील कृषी सहायकांना प्रत्येकी ५ असे एकूण १० सहायकांमार्फत ५० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट देण्यात आले.
पोलादपूर तालुक्यात उन्हाळ्यात गुरांच्या पाण्यासोबतच कपडे, भांडी धुण्याच्या तसेच आवश्यक वाटल्यास पिण्याच्या, आंघोळीच्या पाण्यासाठी वनराई बंधारे उपयुक्त ठरत आहे. मात्र, निवडणुकांच्या काळात वनराई बंधारे बांधण्याचा विसर पडत असल्याने उन्हाळयात पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. पोलादपूर तालुक्यात पंचायत समितीने आतापर्यंत १७ ग्रामपंचायतींच्या मार्फत २१ बंधारे बांधल्याची माहिती गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांच्यावतीने कृषी विस्तार अधिकारी मंगेश साळी तसेच अरूण धीवरे यांनी दिली. यामध्ये तुर्भे खुर्द, धामणदिवी, तुर्भे बुद्रुक, काटेतळी, तुर्भे खोंडा, कोतवाल खुर्द, देवपूर, धारवली, आडावळे बुद्रुक, देवळे, कुडपण बुद्रुक, परसुले आणि गोवेले या ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १ तर सडवली, दिविल, वाकण आणि बोरघर या ग्रामपंचायतींनी प्रत्येकी २ याप्रमाणे २१ वनराई बंधारे बांधले आहेत. दरम्यान, पोलादपूर तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली १० कृषी सहायकांच्या माध्यमातून प्रत्येकी ५ तर तालुक्यात लोकसहभागातून ५० बंधारे उभारण्यात येतील. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार आणि तहसिल कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांच्या समन्वयातून विविध विकास कामांसाठी वापरण्यात आलेली सिमेंटची रिकामी पोती गोळा करण्यात येऊन या वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात येते. वनराई बंधाऱ्यांमुळे उन्हाळयात बंधाऱ्याच्या परिसरातील विहिरी तसेच बोअरवेलच्या पाणीपातळीमध्ये वाढ होते.