मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित सुधारित कार्यक्रम आज मंगळवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची मुदत सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजीपर्यंत म्हणजेच पाच दिवस वाढवण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून १४ ऑक्टोबर २०२५ आणि २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. त्यानुसार, प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचा निर्धारित कालावधी १० डिसेंबर २०२५ असा होता. आता सुधारित वेळापत्रकानुसार, प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचा निर्धारित कालावधी १५ डिसेंबर २०२५ असा करण्यात आला आहे. म्हणजेच ५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करण्याचा निर्धारित कालावधीपूर्वी १५ डिसेंबर २०२५ होता. सुधारित वेळापत्रकानुसार, मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करण्याचा निर्धारित कालावधी २० डिसेंबर २०२५ असा आहे. तसेच, मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करण्याचा यापूर्वीचा कालावधी २२ डिसेंबर २०२५ असा होता. त्यात सुधारणा करून मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करण्याची सुधारित तारीख २७ डिसेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.






