भारतात स्टारलिंगचे प्लॅन्स हे ८ हजार ६०० रुपयांपासून सुरू
वॉशिंग्टन : प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांची सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक ही जगभरात प्रसिद्ध आहे. ही सेवा भारतात कधी सुरू होणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. आता ही प्रतिक्षा संपली असून भारतात देखील सॅटेलाईट इंटरनेट सेवेचा शुभारंभ झाला आहे.
स्टारलिंक इंडियाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या अपडेटनुसार, रेसिडेंशियल प्लॅनचा महिन्याचा दर हा ८हजार ६०० रुपये निश्चित करण्यात आला आहे, तर हॉर्डवेअर किटची किंमत ही ३४ हजार रुपये ठेवण्यात आली आहे आणि ती एकदाच भरावी लागेल. ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा मिळेल. तसेच ही सेवा विकत घेण्याच्या आधी त्याच्या कनेक्शनची चाचणी घेण्यासाठी ३० दिवसांचा ट्रायल कालावधी देखील दिला जाणार आहे. स्टारलिंकने म्हटले आहे की, त्यांचे उपकरण सेट अप करणे सोपे आहे आणि ते सर्व प्रकारच्या हवामानाचा समाना करू शकते.
स्टारलिंकने असाही दावा केला आहे की त्यांचे हे नेटवर्क ९९.९ टक्क्यांहून अधिक अपटाइमसाठी तयार केले आहे. यामुळे, ज्या ठिकाणी स्थिर इंटरनेटचा पर्याय उपलब्ध नाही, अशा ठिकाणी याचा मोठा फायदा होईल.
बिझनेस प्लॅनबद्दलची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. स्टारलिंक लवकरच त्यांचे कमर्शियल पॅकेज जाहीर करेल असे अपेक्षित आहे. कारण कंपनी पूर्ण सेवा लाँच करण्यासाठी काम करत आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे.
कोणाला फायदा होणार?
भारतात स्टारलिंकची सुरूवात ही, पारंपरिक ब्रॉडबँड नेटवर्क मर्यादित आहेत अशा ठिकाणी विद्यार्थी, लहान उद्योग आणि ग्रामीण भागांमधील स्थानिक प्रशासनासाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र भारताच्या टेलिकम्युनिकेशन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतरच स्टारलिंक सेवा भारतात सुरू होऊ शकेल.