Monday, December 8, 2025

योगसाधकांसाठी सुबोध श्लोक

योगसाधकांसाठी सुबोध श्लोक

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके

योग तत्त्वज्ञान आणि योगाची आठ अंगं प्रामुख्यानं संस्कृत ग्रंथांमध्ये सांगितली आहेत. संस्कृत भाषेत कितीतरी ग्रंथांच्या रचना पद्यात म्हणजे श्लोक रूपात केल्या आहेत. योगग्रंथही याला अपवाद नाहीत. अष्टांगयोगाविषयी तसेच योगसंबंधित इतर विषयांवरील अनेक श्लोक योगविषयक ग्रंथांमध्ये तसेच तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांमध्ये सापडतात. काही श्लोक परंपरेनं आपल्यापर्यंत आले आहेत. त्यांचा रचनाकार कोण ते सांगता येतेच असे नाही. या श्लोकांपैकी काही महत्त्वाचे आणि सुबोध श्लोक योगसाधकांना माहीत असावेत म्हणून प्रस्तुत लेखात दिले आहेत. योगसाधना करण्यापूर्वी हे श्लोक म्हटल्यानं प्रत्यक्ष साधना करताना लक्ष अधिक केंद्रित होतं. मन शांत होतं.

यातील काही श्लोक अष्टांगयोगातील अंगांचं वर्णन करताना मागील लेखांमध्ये आले आहेत; परंतु हे सर्व श्लोक एकत्र मिळावेत यासाठी या लेखात दिले आहेत. पुढील श्लोक साधकांप्रमाणे योगशिक्षकांनीही नित्य पठणात ठेवावेत असे आहेत.

१. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन । योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानतोऽस्मि ।।

अर्थ - योगदर्शनाची रचना करून चित्ताचा, व्याकरणाशास्त्राची रचना करून वाणीचा आणि वैद्यकशास्त्राच्या रचनेनं शरीराचा मल ज्यांनी दूर केला अशा मुनिश्रेष्ठ पतंजलीना मी हात जोडून नमस्कार करतो.

२. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिन: । कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ।।

अर्थ - बिंदुसहित ओंकाराचं योगीजन नित्य ध्यान करतात. इच्छा पूर्ण करणाऱ्या तसेच मोक्ष देणाऱ्या ओंकाराला नमस्कार असो.

३. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् । मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांश्च विधेहि न इति ।।

अर्थ - तिन्ही लोकांमध्ये जे सर्व आहे ते प्राणशक्तीमुळे स्थिर आहे. म्हणूनच हे प्राणांनो, आई मुलाचं रक्षण करते त्याप्रमाणे आमचं रक्षण करा. ऐश्वर्य आणि बुद्धी द्या.

४. अशेषतापतप्तानां समाश्रयमठो हठः। अशेष योगयुक्तानामाधारकमठो हठः ॥

अर्थ : संसारात निरनिराळ्या तापांनी जे पोळले आहेत त्यांच्यासाठी हठयोग हा मठाप्रमाणे आश्रयस्थान आहे तर (मेरु पर्वताला स्थिरतेसाठी ज्याप्रमाणे कासवाचा आधार आहे त्याप्रमाणे) योग्यांना हठयोग हा कासवाप्रमाणे आधार आहे.

५. अत्याहार : प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहः । जनसंगश्च लौल्यं च षड्भिर्योगो विनश्यति ॥

अर्थ : अति आहार, अति श्रम, जास्त बोलणं, नियमांचा अति आग्रह करणं, फार जनसंपर्क ठेवणं आणि चंचल वृत्ती ह्या सहा गोष्टी योगाचा विनाश करणाऱ्या आहेत.

६. उत्साहात् साहसाधैर्यात्तत्त्वज्ञानाच्च निश्चयात् । जनसंगपरित्यागात् षड्भिर्योगः प्रसिद्ध्यति ॥

अर्थ : उत्साह, धाडस, धैर्य, सम्यक् ज्ञान, निश्चय आणि जनसंगपरित्याग ह्या सहा गोष्टींनी योग यशस्वीपणे साध्य करता येतो.

७.  हठस्य प्रथमाङ्गत्वादासनं पूर्वमुच्यते। कुर्यात्तदासनं स्थैर्यमारोग्यं चाङ्गलाघवम् ॥१।।

अर्थ : आसन हे हठयोगाचं प्रथम अंग असल्यानं ती प्रथम करावीत. आसनं सुरुवातीला करण्यानं स्थिरता, स्वास्थ्य व हलकेपणा येतो.

८. चले वाते चलं चित्तं निश्चले निश्चलं भवेत्। योगीस्थाणुत्वमाप्नोति ततो वायुं निरोधयेत् ॥

अर्थ : श्वास चालतो तेव्हा चित्तसुद्धा चालते. (चंचल असते.) श्वास थांबला तर चित्तही स्थिर होते. त्यामुळे योग्याला स्थिरता प्राप्त होते. म्हणून श्वासाचा निरोध करावा. (प्राणायाम करावा)

९. प्राणायामेन युक्तेन सर्वरोगक्षयो भवेत्। अयुक्ताभ्यासयोगेन सर्वरोगसमुद्भवः ॥

अर्थ : योग्यप्रकारे प्राणायाम करण्यानं सर्व रोगांचा नाश होईल. पण अयोग्य पद्धतीनं प्राणायाम केल्यास सर्व प्रकारचे रोग उद्भवतील.

१०. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनम् । शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् ॥

अर्थ : भूमीवर प्रेतवत् उताणं पडून राहणं यालाच शवासन म्हणतात. शवासन थकवा घालवतं व मनाला विश्रांती देतं.

११. युवा वृद्धोऽतिवृद्धो वा व्याधितो दुर्बलोऽपि वा। अभ्यासात् सिद्धीमाप्नोति सर्वयोगेष्वतन्द्रितः ॥

अर्थ : कोणीही तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, रोगी किंवा दुर्बल असा असला तरीही त्यानं जर सातत्यानं योगाभ्यास केला तर आळस जाऊन योगसिद्धी मिळते.

१२. क्रियायुक्तस्य सिद्धिः स्यादक्रियस्य कथं भवेत् । न शास्त्रपाठमात्रेण योगसिद्धिः प्रजायते ॥

अर्थ : नित्य योगसाधना करणाऱ्यांनाच सिद्धी मिळते. अशी साधना न करता सिद्धी कशी मिळेल ? योगामधील यश केवळ पुस्तकं वाचून मिळणार नाही.

१३. न वेषधारणं सिद्धेः कारणं न च तत्कथा। क्रियैव कारणं सिद्धेः सत्यमेतन्न संशयः ॥

अर्थ : नुसता वेष धारण करणे (भगवी वस्त्रे परिधान करणे इ.) आणि त्या संदर्भात नुसत्याच गप्पा गोष्टी करणं ही योगसिद्धीची लक्षणं नसून प्रत्यक्ष नित्य योगसाधना करणं हेच सिद्धी मिळण्याचं कारण आहे. हेच सत्य आहे, याबद्दल संशय नाही.

१४. वपुःकृशत्वं वदने प्रसन्नता नादस्फुटत्वं नयने सुनिर्मले। अरोगता बिन्दुजयोऽग्निदीपनं नाडीविशुद्धिर्हठसिद्धी लक्षणम् ॥

अर्थ : शरीराची कृशता, चेहऱ्यावरील प्रसन्नता, सुस्पष्ट आवाज, डोळ्यांमधील तेज, रोगांपासून मुक्तता, वीर्यावरील नियंत्रण, अग्नीप्रदीप्ती व नाडी विशुद्धी ही हठयोगाच्या सिद्धीची लक्षणं आहेत.

Comments
Add Comment