Monday, December 8, 2025

कलाविश्वातील सृजनी

कलाविश्वातील सृजनी

कर्तृत्ववान ती राज्ञी : दीप्ती भागवत

वैशाली गायकवाड

नमस्कार मैत्रिणींनो, बघता बघता मार्गशीर्ष महिन्याचे दोन गुरुवार झाले सुद्धा. या महिन्यात दत्त जयंती, महालक्ष्मीचे व्रत हे घरोघरी केले जाते•. सात्त्विक आणि अध्यात्मिक वातावरण सर्वत्र दिसून येते. या दोन्ही गुणांचा संगम असणाऱ्या संस्कार, कला आणि अध्यात्म यांची सुंदर वीण गुंफणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री, निवेदिका, गायिका, लेखिका 'दीप्ती भागवत’ यांच्या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

त्यांचे बालपण वसईच्या समृद्ध अशा वाडा संस्कृतीत फुलले. आई स्वतः संगीत आणि मराठीची शिक्षिका असल्याने, वडिलांच्या नोकरीतील बदल्यांमुळे शिक्षणात अडथळा नको म्हणून त्या आई व भावासह आजोळी म्हणजेच वसईला स्थायिक झाल्या. आजी उत्तम गात असल्याने, घरात सांस्कृतिक वातावरण होते  आजीनी लहानपणीच गाणी शिकवून, त्यांना गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सवासारख्या स्पर्धांसाठी प्रोत्साहित केले. न कळत्या वयातच गाण्याच्या स्पर्धांमधून स्टेजवर गेल्यामुळे, त्यांना रंगमंचाची भीती कधीच वाटली नाही.

संगीताच्या शिक्षणातून पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त करताना, त्यांनी अभिनयातही स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. स्वरांची भाषा अवगत असल्यामुळे, त्याचा उपयोग अभिनयातील भूमिकेची 'पट्टी' पकडण्यासाठी झाल्याचे दीप्तीताई आवर्जून सांगतात.

वेस्टर्न रेल्वेत सांस्कृतिक सचिव आणि उत्तम संगीतकार असणारे मकरंद भागवत यांच्याशी १९ व्या वर्षी त्यांचा विवाह होऊन त्या मुंबईकर झाल्या. अगदी लवकर लग्न होऊनही, त्यांचे पुढील शिक्षण आणि करिअर अखंडपणे सुरू राहिले. 'लग्न झाल्यानंतर बऱ्याच मुली उत्तम काम करत असताना सुद्धा त्यांचं करिअर थांबतं, तसं माझं झालं नाही'. याचं श्रेय त्या पती, आई-वडील व सासू-सासरे यांना देतात.

त्यांच्या कारकिर्दीला एक महत्त्वपूर्ण वळण मिळाले ते ‘वर्ल्ड सॅटेलाईट रेडिओ’मध्ये आरजे म्हणून काम करताना. या काळात अंतरबाह्य घडवणारी प्रक्रिया त्यांना अनुभवायला मिळाली. मुलाखतीसाठी ‘पूर्व तयारी’ आणि ‘कंटेंट’सहित उत्कृष्ट बोलणे या गुणांमुळे त्या रेडिओच्या ‘चॅनल व्हॉईस’ म्हणूनही ओळखल्या जाऊ लागल्या. रेडिओसाठी काढलेल्या नऊवारीतील फोटोमुळे त्यांची स्टार प्रवाहवर येणारी राजा शिवछत्रपती मालिकेसाठी थेट निवड झाली•. त्यानंतर त्यांची अभिनेत्री म्हणून यशस्वी वाटचाल सुरू झाली. स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेमधील महाराणी येसूबाईची भूमिका, मेरे साईमध्ये रुक्मिणी कुलकर्णी, स्वामिनी, उंच माझा झोका यांसारख्या विविध मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.

रेडिओ, दूरदर्शन यासोबतच त्यांची रंगमंचावर काम करण्याची आवडही त्यांनी जोपासली. डबल लाईफ हे नाटक तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ या नाटकात पहिल्या पंचवीस प्रयोगात माई सावरकरांची भूमिका त्यांनी साकारली, अ परफेक्ट मर्डर या नाटकात आता काम करत आहेत. दमलेल्या बाबांची कहाणी, माझी तपस्या, मोगरा फुलला अशा चित्रपटांमधूनही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत•. माय विश आणि मुक्ती पर्व यांसारख्या शॉर्ट फिल्म मध्येही त्यांनी काम केले आहे. अनेक मान्यवरांसोबत निवेदन करण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. •झी टॉकीजवरील 'गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा' या कार्यक्रमाचे त्यांचे निवेदन अत्यंत श्रवणीय व भक्तिमय असे आहे. हा कार्यक्रम गेली सात वर्षे अविरत चालू आहे.

विशेष उल्लेखनीय म्हणजे पिंजरा या मालिकेमधील त्यांनी साकारलेली शालिनी ही भूमिका खूप गाजली. या भूमिकेसाठी त्यांना झी मराठीचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखेचा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या सोज्वळ आणि सात्त्विक भूमिका त्यांना अध्यात्माच्या जवळ घेऊन गेल्या. संत ज्ञानेश्वर मालिकेतील संत मुक्ताईंची अप्रतिम भूमिका त्यांच्या हृदयाच्या खूप जवळची होती. "मुक्ताई कोणी करायची हे मुक्ताईंनीच ठरवलेलं आहे", असे उद्गार त्यांचे दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांनी काढले होते.

आत्मपरीक्षण करताना त्यांना जे गवसले, ते व्यक्त करण्यासाठी त्यांनी लेखणीचा आधार घेतला. 'पितृपक्षात खऱ्या अर्थाने श्रद्धांजली' अर्पण करण्याच्या भावनेतून त्यांनी दिवंगत आप्तांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे लेख लिहिले, ज्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. 'प्रत्येक महिलेने व्यक्त झाले पाहिजे कारण लेखणी तुम्हाला आतून मोकळे होण्याची संधी देते. ‘सखी ही माझी अभिव्यक्ती आहे. मला नेहमी वाटतं की मी कधीच लिहीत नाही, तर ही सखी माझ्याकडून लिहून घेते. अशी ही माझ्यातील ती, जेव्हा मला साद घालते, काही सांगू पाहते त्यावेळी मी सखीची कृतज्ञता म्हणून सखी दीप्ती नावाने काव्यातून लेखनातून व्यक्त होते’असे मनोगत त्या त्यांच्या 'सखी दीप्ती' या यूट्यूब चैनलवरून व्यक्त करतात.

उत्तम जीवन जगण्यासाठी शरीर आणि मनाचे आरोग्य उत्तम राखणे महत्त्वाचे असते. यासाठी योग, ब्रह्मविद्या आणि ध्यान ही त्यांच्या जीवनाची त्रिसूत्री त्या महत्त्वाची मानतात. शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी 'स्व-काळजी', ही प्राथमिकता प्रत्येकाची असली पाहिजे'. 'दिवसभरातली ४० मिनिटं' स्वतःसाठी काढली पाहिजेत, असा अत्यंत उपयुक्त सल्ला त्या सगळ्यांना देतात.

त्यांच्या सुरेल आवाजामुळे त्यांना 'गानहिरा' पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांच्या मते, पुरस्कारांपेक्षा चांगल्या माणसांचा सहवास लाभणे हाच मोठा पुरस्कार आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून मिळालेले लता दीदींच्या स्वाक्षरीचे घड्याळ किंवा महंत ह.भ.प.नामदेव शास्त्रीजींकडून मिळालेले आशीर्वाद हे त्यांना भौतिक गोष्टींपेक्षा अधिक 'श्रीमंत' करतात. त्यांची कन्या जुई (एमए इंग्लिश लिटरेचर, कथ्थक विशारद) ही देखील आईच्या पावलावर पाऊल ठेवून गुलकंद, झापूक झुपुक, लाईक आणि सबस्क्राईब अशा चित्रपटांतून अभिनय क्षेत्रात उत्तम काम करत आहे. सोबतच 'कोकण कन्या' बॅण्डमधून गायिका या भूमिकेत रसिकांचे मनोरंजन करते आहे.

दीप्ती ताईंची कला विश्वातील अविरत मुशाफिरी ही अत्यंत ऊर्जादायी अशी आहे•. भविष्यात स्वतःचे काही लेख, कविता, गाणी, अभिवाचन असा एक स्वतंत्र कार्यक्रम करण्याचा त्यांचा मानस आहे. वेळेस गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, धार्मिक ठिकाणी अन्नदान अशा माध्यमातून समाजाप्रती फूल न फुलाची पाकळी म्हणून सामाजिक कार्यात त्या आपले योगदान देतात.

कलेच्या आकाशात आपली स्वतंत्र दीप्ती निर्माण करणारी, अध्यात्माच्या शांत मार्गावर स्वतःला सतत परिष्कृत करणारी आणि प्रत्येक भूमिकेतून जीवनाशी संवाद साधणारी ही कलाविश्वातील सृजनी म्हणजे अर्थातच 'दीप्ती भागवत'. यांची स्वतःला सतत नव्याने ओळखण्याची अद्वितीय शक्ती ही आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत प्रेरणादायी अशी आहे.

Vaishu.gaikwad78@gmail.com

Comments
Add Comment