Tuesday, December 9, 2025

तब्बल २८ तासांच्या प्रयत्नानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण

तब्बल २८ तासांच्या प्रयत्नानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून त्यांना कार्यक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन स्वरूप देण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिका सातत्याने व्यापक उपाययोजना राबवत आहे. याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून ७५ वर्षे जुन्या, जीर्ण झालेल्या तसेच वहनक्षमता गमावलेल्या जलवाहिन्यांच्या बदलाची महत्त्वाकांक्षी मोहीम राबवली जात आहे. मोठ्या व्यासाच्या नव्या जलवाहिन्या टप्प्याटप्प्याने अंथरण्‍यात येत असल्यामुळे पाणीगळती, दूषित पाणीपुरवठा आणि रस्‍ते खचणे यांसारख्या दीर्घकालीन समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. या मोहिमेतील एक निर्णायक टप्पा म्हणून तानसा धरणातून भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी २७५० मिलीमीटर व्यासाची जीर्ण झालेली जलवाहिनीच्या बदलाची कार्यवाही मंगळवारी ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी पूर्ण करण्यात आली आहे.

या कामाचे स्वरूप अत्यंत जटिल, आव्हानात्मक व जोखमीचे होते. जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे अत्यावश्यक काम काल सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू करण्यात आले. हे काम मंगळवारी ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता पूर्ण झाले. मंगळवारी या प्रक्रियेस साधारणतः २८ तासांचा कालावधी लागला. जल अभियंता विभागाच्या सातत्यपूर्ण, नियोजित आणि युद्धपातळीवरील प्रयत्नांमुळे हे काम नियोजित वेळेनुसार, यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी पूर्ण करण्यासाठी जल अभियंता विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्कृष्ट समन्वय राखून अथक परिश्रम घेतले. या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य केल्याबद्दल १७ प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) नागरिकांचे मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत आभार मानण्‍यात येत आहे. जलवाहिनी बदलण्‍यात आल्‍यानंतर आता १७ प्रशासकीय विभागांचा पाणीपुरवठा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरळीत होत आहे.

मुंबईतील पाणीपुरवठा यंत्रणेचा कणा असलेल्या अनेक जलवाहिन्या या ब्रिटिशकालीन किंवा ७०–८० वर्षांपूर्वीच्या आहेत. जीर्ण जलवाहिन्‍यांमुळे पाणीपुरवठ्यात अडथळे, भूमिगत गळती आणि वहनक्षमता कमी होत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका सातत्याने दुरुस्ती, डागडुजी, तसेच आधुनिक आणि सक्षम जलवाहिन्‍या अंथरण्‍याची कार्यवाही करत आहे. सुरक्षित, स्वच्छ आणि अखंडित पाणीपुरवठा हा मुंबईकरांचा मूलभूत हक्क असून, तो अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.

Comments
Add Comment