Tuesday, December 9, 2025

हजारो शिक्षकांना दिलासा! शाळा बंद पडणार नाहीत, पटसंख्येची अट होणार शिथील

मुंबई: कमी पटसंख्या असल्याचं कारण देत राज्यभरातील ७०० मराठी शाळा बंद पडण्याची आणि २५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भिती निर्माण झाली आहे.१५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयाला शिक्षकांचा जोरदार विरोध होत आहे.याबाबतच आता महत्त्वाची अपडेट समोर आली, असून पटसंख्येच्या निकषात बदल केला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

पटसंख्येची अट होणार शिथील...

समोर आलेल्या माहितीनुसार, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे.सध्या जिल्हा परिषद,महापालिका,नगरपालिका शाळांची पटसंख्या पहिल्यांदा २० डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.त्यानंतर पुढील दहा दिवसांत खासगी प्राथमिक शाळांची व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचीही पटसंख्या याच दिवसात पूर्ण होणार आहे.या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन होईल.

सुरवातीला त्याच शाळेत,त्याच तालुक्यात,जिल्ह्यात समायोजन होईल.त्यानंतर विभागात आणि शेवटी राज्यात कोठेही त्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार आहे.दरम्यान,नववी व दहावीच्या ज्या वर्गातील विद्यार्थी २० पेक्षा कमी आहेत,तेथील शिक्षक अतिरिक्त होणार आहेत.या निर्णयात समायोजनापूर्वी बदल होण्याची शक्यता असून त्याचा शासन निर्णय डिसेंबरअखेर अपेक्षित असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

दरम्यान,२०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार समायोजनाचा शासन निर्णय मागे घेण्यात आला आहे.आता २०२५-२६ ची संचमान्यता अंतिम झाल्यावर समायोजनाची कार्यवाही होईल.पण, संचमान्यतेसाठी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या निकषात बदल करावा,असा प्रस्ताव शासनाला यापूर्वीच पाठविला असून त्यावर कार्यवाही सुरु आहे,अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.महेश पालकर यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment