नागपूर: नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारला अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. पटोले म्हणाले, "सरकारला एवढी घाई काय आहे? हे अधिवेशन कृपया वाढवावे आणि किमान दोन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे." या मागणीला उत्तर देताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांना आठवण करून दिली की, "आपण कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला काही कारणास्तव उपस्थित नव्हता." यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी, "आम्ही सभागृहामध्ये ८ ते १९ डिसेंबरपर्यंत अधिवेशन घ्यावे, असे बोललो होतो," असे स्पष्ट केले.
या चर्चेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेतली. त्यांनी पटोले यांच्या मागणीवर आक्षेप घेत म्हटले की, "अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपण पुरवणी मागण्या दाखवतो. गेल्या २५ वर्षांत मी एकमेव मुख्यमंत्री आहे, ज्याने नागपूरमध्ये सर्वाधिक कालावधीचे अधिवेशन घेतले." पटोले यांच्यावर टीका करताना फडणवीसांनी पुढे सांगितले की, "नाना पटोले यांच्या काळात मुंबईतही तीन आणि चार दिवसच अधिवेशन चालले होते." अखेरीस, नाना पटोले यांनी पुन्हा एकदा अधिवेशन वाढवण्याची मागणी केली असता, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी "गरज पडल्यास यावर विचार करू," असे आश्वासन दिले.