Wednesday, January 14, 2026

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त करार

मुंबई : महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला आहे, यामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, तसेच बाडेन-वुटेमबर्ग राज्य येथील सामाजिक व्यवहार, आरोग्य आणि एकात्मता मंत्रालयाचे उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या करारानुसार भाषा प्रशिक्षण, प्रगत कौशल्य विकास, प्रमाणपत्र मान्यतेची प्रक्रिया सुलभ करणे, तसेच जर्मनीत नोकरी स्वीकारणाऱ्या नर्सेसच्या सन्मान व संरक्षणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळाची निर्मिती हा या कराराचा केंद्रबिंदू असणार आहे. दोन्ही राज्यांतील नर्सिंग शिक्षण संस्था, विद्यापीठे व प्रशिक्षण केंद्रांदरम्यान विद्यार्थी–प्राध्यापक आदानप्रदान, संयुक्त प्रशिक्षण, अभ्यासदौरे आणि संशोधन उपक्रम राबवून शिक्षणाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा उद्देश असल्याचे मंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. मंत्री मॅनफ्रेड लुखा म्हणाले, दोन्ही राज्यादरम्यान नर्सिंग व आरोग्यसेवा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. कौशल्याधारित आरोग्यसेवेचा विस्तार करणे, संशोधनाला चालना देणे तसेच परदेशी रोजगार संधी उपलब्ध करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. या सहकार्यामुळे तरुणांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ अधिक प्रशिक्षित व सक्षम होईल. बाडेन-वुटेमबर्ग राज्याच्या प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्र राज्याचा दौरा केला होता. नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य वाढवणे, प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे व कौशल्य विकासासाठी नवीन मार्ग उभारणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश होता. यामुळे नर्सिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय भागीदारी बळकट होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >