Sunday, December 7, 2025

पुतीन यांच्या भेटीचा मथितार्थ

पुतीन यांच्या भेटीचा मथितार्थ

आंतरराष्ट्रीय राजकारणात ऑप्टिक्सला प्रचंड महत्त्व असते. भारत आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यात भारताने हाच संदेश जगाला देण्याचा प्रयत्त्न केला आहे. पुतिन यांची भारत भेट ही समारंभपूर्वक दिखाऊपणाच्या अगदी पार पलीकडे जाणारी आणि दोन्ही देशांत असलेल्या अनेक वर्षांपासूनच्या संबंधांना आणखी बळकट करणारी आहे. अमेरिका आणि त्यांच्या मांडलिक देशांनी पुतिन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतरही मोदी यांनी पुतिन यांचे स्वागत केले आणि त्यातून हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला, की ध्रुवीकृत जागतिक वातावरणात भारताची भूमिका बदललेली नाही. अलिप्तता चळवळ ही आपली अगोदर प्रमुख होती, पण तिसऱ्या देशाची ताकद जशी क्षीण होत गेली तशी त्या चळवळीचे महत्त्व ओसरू लागले. हे ओळखून भारताने अलिप्तता चळवळीकडे पूर्ण दुर्लक्ष न करताही भारताचे कोणत्याही राष्ट्राच्या आहारी न जाण्याचे आणि कुणालाही फारसे जवळ येऊ न देण्याचे धोरण कायम ठेवले. पुतिन यांच्या या भारत भेटीत दोन्ही देशांनी १६ सामंजस्य करार केले आणि त्यात संरक्षण, शिक्षण आणि ऊर्जा विषयक करारांचा समावेश होता. त्याचबरोबर २०३० पर्यंतचा रोडमॅप तयार करण्यात आला.

ही भेट महत्त्वाची होती. कारण लाक्षणिक अर्थाने हे निश्चित करण्यात आले, की जागतिक अस्थिरता आणि अशांतता असतांनाही भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री ही विश्वास आणि परस्परविषयक आदराची जपणूक करणारी आहे. या भेटीनंतर उभय देशांनी जाहीर केले, की पुतीन आणि मोदी यांच्यातील भेटीतून द्विपक्षीय सहकार्य केवळ मजबूत झाले आहे. भारताच्या मित्रत्वाच्या बाजूने रशिया प्रथमपासूनच होता आणि अमेरिकेच्या दादागिरीला भारताचे नेतृत्व झुकले नाही, तेव्हाही रशियाच भारताच्या मदतीला धावून आला होता. आता बंगालच्या उपसागरात अमेरिकेने कशा आपल्या युद्धनौका आणल्या होत्या आणि रशियानेच भारताला त्यावेळी वाचवले होते. हा सारा इतिहास झाला. पण तेव्हापासून भारताचा खंदा मित्र म्हणून रशिया उभा आहे. पुतीन यांच्या भारत भेटीचे सर्वात महत्त्वाचे फलित म्हणजे भारतीय फार्मा कंपन्यांना रशियाने उत्पादन करण्यास परवानगी दिली आहे हाच आहे. रशियासाठी भारताची औषधे ही विश्वासार्हता प्रदान करतात आणि भारतासाठी यामुळे भारतीय औषधांची नागरिकांच्या जीवितासाठी महत्त्वपूर्ण बाब म्हणून ओळख मजबूत करते. भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्याच्या करारामुळे दोन्ही देशांच्या संयुक्त युरिया उत्पादन सुविधांच्या भारतात प्रस्थापित होण्याला चालना मिळणार आहे. त्यामुळे भारताची शेती क्षेत्रात प्रगती होणार आहे. यामुळे अपरिहार्यपणे भारताला होणारा फायदा म्हणजे भारताची आयातीवरील अवलंबितता कमी होईल. अगोदरच भारताची आयात जास्त आहे आणि निर्यात कमी आहे. त्यामुळे आयात-निर्यात समतोल ढासळतो. तो या निर्णयामुळे बराचसा कमी होईल. पुतीन यांनी भारत आणि रशिया यांच्यातील संस्कृतिक संबंधांची आठवण काढताना अभिनेते राज कपूर यांची आठवण काढली आणि त्यामुळे दोन्ही देशांत सांस्कृतिक आदान-प्रदान किती महत्त्वाची चालली होती आणि किती प्रदीर्घ काळापासून चालत आली आहे याचे स्मरण झाले. ही भागीदारी बहुध्रुवीय जगात नुसती महत्त्वाची नाही, तर चेन्नई व्लादिवोस्तोक मॅरिटाईम कॉरिडोरद्वारे सर्वात भू-राजकीय परिणाम दिसून आला आहे. याचा संबंध तामिळनाडूनतील कोडाईकुलम आणि रशियातील व्लादिवोस्तोक कॉरिडोरमुळे उभय देशांतील प्रवासाचा काळ महत्त्वपूर्ण कमी होणार असून नव्या पुरवठा लाईन्स सुरू होतील. चीनविरोधात भारत एकीकडे इंडो पॅसिफिक सागरात झुंज देत असताना या नव्या कॉरिडोरमुळे भारताला रशियाच्या अति पूर्वेतील प्रयत्नांना साथ देता येऊ शकेल. हा केवळ आर्थिक प्रकल्प नाही, तर भारताची सागरी आणि युरेशियन कनेक्टिव्हिटी वाढवणारा प्रकल्प आहे.

मोदी-पुतीन यांची भेट ही केवळ स्वतंत्र राजनैतिक भेट नव्हती, तर निश्चित करणारा माईलस्टोन होता. ज्याचे जागतिक परिणाम मजबुती, स्थैर्य आणि नागरी व्यवस्थेत होतील. शीतयुद्धकालीन परिस्थिती झपाट्याने बदलत आहे आणि त्या परिप्रेक्ष्यात या भेटीकडे पाहिले पाहिजे. जग आज मल्टीपोलर होताना भारताला अमेरिकेवरच आपले ध्यान लावून बसणे शक्य नव्हते. पुतीन ही कितीही पाश्चात्य राष्ट्रांनी आव आणला तरीही दुर्लक्षणीय शक्ती नाही. हे ओळखून नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांची भारत भेट आयोजित केली आणि त्यातून अमेरिकेला संदेश दिला, की ट्रम्प यांच्यापासून वेगळे मार्ग शोधावे लागतील. भारत आणि रशिया यांच्या एकत्र येण्यामुळे अमेरिका अस्वस्थ होणे साहजिक आहे. अगोदर जी-२० परिषदेत मोदी यांनी जाऊन दक्षिण आफ्रिकेला ट्रम्प नसले तरीही जी-२० यशस्वी होऊ शकते असा संदेश दिला आणि आता पुतीन यांच्या भारत भेटीमुळे दुसरा दणका दिला आहे. कारण ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धोरणामुळे भारतात अस्वस्थता आहे. त्यावर उत्तर भारताला शोधावेच लागणार आहे आणि त्यात रशियाची मदत घेतली, तर कुठेच बिघडले नाही. भारत रशिया संबंधांना नवी दिशा मिळाली आहे हे निश्चित आहे. परराष्ट्र संबंधांना बिटवीन लाईन्सला महत्त्व असते. जे सांगितले त्यापेक्षा जे नाही ते सांगितले ते जास्त महत्त्वाचे असते. मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे याच परिप्रेक्ष्यातून पाहावे लागेल. रशिया-युक्रेन युद्धामुळे रशिया एकटे पडल्याची भावना निर्माण झाली होती. ती मोदी-पुतीन यांच्या भेटीमुळे बऱ्याच प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. अर्थातच पुतीन यांचे भव्य स्वागत केल्यामुळे अमेरिका आणि पाश्चात्य जग अस्वस्थ झाले आहे. पण मोदी यांनी पुतीन यांचे स्वागत करून पाश्चात्य देशांच्या दबावाला बळी पडणारे आपण नाही हे सिद्ध केले. त्यात भारताचा लाभ झाला आहे. त्यामुळे अमेरिकेचा थयथयाट समजण्यासारखा आहे. पुतीन यांच्या भारत भेटीचा निष्कर्ष असा काढता येईल, की त्यामुळे भारत-रशिया संबंधांची दृढता, सामरिक भागीदारीचे नूतनीकरण आणि संरक्षण याचे जागतिक भू-राजकीय मुद्यांवर सहकार्याची पुष्टी देण्यात आली. पुतीन यांची भारत भेट ट्रम्प यांच्यासाठी निश्चितच आश्वासक नाही.

Comments
Add Comment