Monday, December 8, 2025

जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा, मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश

जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा, मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश
पुणे : 'इंडिगो' च्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसलेल्या प्रवाशांकडून जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा असे निर्देश कंपनीला देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ''प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती नेमण्यात आली असून, अहवालानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाईल. ज्याची चूक असेल, त्याच्यावर कठोर कारवाई होईल'', अशी ग्वाही त्यांनी दिली. पिडीत प्रवाशांच्या तिकिटाचा परतावा आणि साहित्य परत करण्याबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयांची त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. विमान कंपन्यांच्या मनमानी कारभारावर त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयामार्फत तिकीट दरांवर मर्यादेसह प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. इतर विमान कंपन्यांनी वाढविलेले तिकीट दर नियंत्रणात आणले आहे. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे. स्थिती त्वरित सुधारण्यासाठी ‘फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन’ (एफडीटीएल) काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment