Monday, December 8, 2025

एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली; आयोगाने जाहीर केल्या नव्या तारखा

एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली; आयोगाने जाहीर केल्या नव्या तारखा

मुंबई : एमपीएससीची २१ डिसेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आयोगाने नव्या तारखा जाहीर करून विद्यार्थ्यांच्या संभ्रमाला अखेर पूर्णविराम दिला आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या मतमोजणीमुळे परीक्षा त्या दिवशी घेणे शक्य नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

एमपीएससी उमेदवारांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरत होती. निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबरलाच असल्याने परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी होणार का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठी शंका निर्माण झाली होती. अखेर आयोगाने परिपत्रक काढून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

आयोगाच्या घोषणेनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ आता नव्या तारखांना घेण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा ४ जानेवारी २०२६ आणि ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. यासंबंधीचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार, २१ डिसेंबर रोजी परीक्षेच्या वेळेतच राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतींची मतमोजणी होणार होती. अनेक जिल्हा केंद्रांवर परीक्षा उपकेंद्र आणि मतमोजणी ठिकाणे अतिशय जवळ आहेत, लाऊडस्पीकरचा आवाज, मिरवणुकीमुळे होणारा गोंधळ, वाहतूक कोंडी, तसेच परीक्षा कर्मचारी उपलब्धतेची अडचण या कारणांमुळे परीक्षा सुरळीत घेणे अवघड होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या सर्व बाबींचा विचार करून आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment