Sunday, December 7, 2025

गुंतवणूक कशासाठी आणि कुठे?

गुंतवणूक कशासाठी आणि कुठे?

उदय पिंगळे

गुंतवणूक केल्याने काही कालावधीनंतर तुमच्या पैशांत वाढ होते. त्यामुळे तुमचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करता येतं. गुंतवणुकीची सुरुवात लवकरात लवकर करणे कधीही चांगलंच. पहिली कमाई जेव्हा तुमच्या हातात पडेल त्याच दिवसापासून गुंतवणूक करणे योग्य होईल. अनेक कारणांसाठी गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

गुंतवणूक केल्याने पैशांमध्ये वाढ होते.

महागाईवर मात करण्यास गुंतवणूक उपयोगी पडते.

गुंतवणूक केल्याने विविध आर्थिक उद्दीष्टे पूर्ण होण्यास मदत होते.

आधीपासूनच आणि नियमितपणे गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी मोठी रक्कम जमा होण्यास मदत होते.

गुंतवणुकीची सुरुवात करण्याआधी तुमचे जरुरीचे खर्च भागतील एवढे नियमित उत्पन्न असणे गरजेचं आहे.

आणीबाणीच्या प्रसंगी - नोकरी जाणे अशा प्रसंगी तुमचे खर्च भागतील एवढा राखीव निधी तुमच्याकडे असायला हवा.

वैद्यकीय आणीबाणी उद्भवल्यास पुरेसे विमाछत्र तुमच्याकडे असले पाहिजे.

तुमचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूक लवकरच सुरू करणे फायदेशीर ठरते. नियमितपणे आणि सातत्याते छोटीशी योग्य गुंतवणूक करत राहिलात तर संपत्ती निर्माण होईल आणि तुमची आर्थिक उद्दिष्टं पूर्ण होण्यास मदत होईल.

लवकरच केलेल्या गुंतवणुकीच्या वाढीस चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो.

लवकर सुरुवात केलेल्या गुंतवणुकीवर बाजारातील अल्पकालीन चढ उताराचा फारसा फरक न पडता दीर्घकाळात भरघोस वाढ होते.

जेव्हा तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक करता तेव्हा त्यामध्ये बचत खात्यात पैसे ठेवून मिळणाऱ्या परताव्याहून अधिक वाढ होण्याची शक्यता असते. गुंतवणूक करण्यात जोखीम आहे कारण त्यातून निश्चित किती परतावा मिळेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे यातून मिळणारा परतावा निश्चित नाही हे स्वीकारण्याची तुमची मानसिक तयारी असणे गरजेचे आहे. ती होण्यासाठी गुंतवणूक संदर्भातील काही प्राथमिक गोष्टी माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.

सुजाण गुंतवणूकदार होण्यासाठी तुम्हाला हे माहिती असायलाच हवं

उद्दिष्ट- कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी निश्चित आर्थिक उद्दिष्ट असायलाच हवं जसे की घर खरेदी, मुलांचे उच्चशिक्षित, निवृत्ती नियोजन इ.

गुंतवणूक मर्यादा - तुमच्या गुंतवणुकीची निश्चित अशी कालमर्यादा असू द्या. या काळात चक्रवाढ गतीचा लाभ गुंतवणूकीस मिळेल.

जोखीम घेण्याची क्षमता - तुम्ही किती नुकसान सहन करू शकता यावर तुमची जोखीम क्षमता ठरते. जितका अधिक परतावा गुंतवणुकीतून मिळू शकतो त्या प्रमाणात गुंतवणूक जोखीम वाढत रहाते.

गुंतवणूक ज्ञान - गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी त्याची प्राथमिक माहिती करून घ्यावी. जर तुम्ही नव-गुंतवणूकदार असाल तर ऑप्शनसारख्या कठीण गुंतवणुकीचा विचार करण्याऐवजी तुम्हाला समजेल अशा सोप्या गुंतवणुकीपासून सुरुवात करावी आणि योग्य ज्ञान मिळवूनच कठीण गुंतवणुकीचा विचार करावा.

गुंतवणुकीचे तीन आधारस्तंभ - सुरक्षितता, परतावा आणि रोकड सुलभता हे कोणत्याही गुंतवणुकीचे आधारस्तंभ आहेत. गुंतवणूक करताना आपले भांडवल सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. त्यातून बाजारात उपलब्ध असलेल्या दराहून अधिक परतावा मिळायला हवा त्याचप्रमाणे त्याचे पैशांत सहज रूपांतर करता आले पाहिजे.

गुंतवणूक इतिहास आणि भविष्यवेधाची शक्यता - मूलभूत दृष्टिकोनातून गुंतवणूक आणि त्यातील वृद्धीकडे पाहावे.

विविध मालमत्तांमध्ये विभागणी - गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात विभागली गेली असता त्यातील एखादा मालमत्ता प्रकार न चालल्याने त्यातून होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी होते.

मालमत्ता प्रकारांतील सहभाग - मालमत्ता प्रकारातील सहभाग हा आर्थिक उद्दिष्ट, कालावधी, जोखीम क्षमता आणि बाजाराचा कल यावर अवलंबून असतो. विविध प्रकारातून मिळणाऱ्या परताव्याची गणना करणारे गणक उपलब्ध असून त्याचा वापर केल्यास आपल्याला निष्कर्ष काढण्यात त्यांचा उपयोग होतो.

करपरिणाम - विविध मालमत्तामधून मिळणाऱ्या परताव्यावर कमी अधिक प्रमाणात कर आकारला जात असल्याने त्याचा गुंतवणूक परताव्यावर होणारा परिणाम पडताळणे आवश्यक असते.

गुंतवणुकीचे पुनरावलोकन - विविध गुंतवणूक त्यातून मिळणाऱ्या परातव्यासह पाहून गुंतवणूक उद्दीष्ट पूर्ण करण्यास आवश्यक असल्यास त्यात बदल करावेत. असे बदल उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी करावेत.

गुंतवणूक योग्य विविध मालमत्ता प्रकार

शेअर्स - शेअर्स म्हणजे कंपनीच्या मालकीतील म्हणजे भाग भांडवलातील एक हिस्सा. जेव्हा तुम्ही शेअर्स घेता तेव्हा तुम्ही कंपनीचे भागधारक बनता. त्यातून मिळणारा परतावा मुख्यतः कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असतो. शेअर्सचा बाजारभाव वाढल्यास भरघोस फायदा होऊ शकतो. त्यासोबत असलेले धोके म्हणजे त्याच्या बाजारभावात सातत्याने होणारे चढ उतार आणि कंपनीच्या आर्थिक स्थितीत होणारे बदल. कर्ज रोखे- कर्जरोखे म्हणजे कंपनीने घेतलेले कर्ज. असे कर्ज रोखे कंपन्या त्याच्या व्यवसाय वृद्धीसाठी तर स्थानिक स्वराज संस्था सरकार काही विशिष्ट हेतूने काढू शकते. कर्ज घेणारा म्हणजेच ऋणको हा गुंतवणूकदार म्हणून धनको कडून कर्ज घेतो त्याबद्दल व्याज नियमित अंतराने आणि मुद्दल मुदतपूर्ती च्या वेळी परत करण्याची हमी देतो. कर्करोख्यासोबत येणारी जोखीम म्हणजे व्याज नियमितपणे न मिळण्याची आणि मुदतपूर्तीच्या वेळी मुद्दल वेळेवर न मिळण्याची शक्यता या आहेत.

म्युच्युअल फंड - म्युच्युअल फंड विविध गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्रित करून वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात उदाहरणार्थ शेअर्स, बॉण्ड आणि इतर मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंड गुंतवणूक दारांना विविध मालमत्ता प्रकारात फारसा अभ्यास न करता शेअरबाजारात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देतात. म्युच्युअल फंडांकडे व्यावसायिक फंड मॅनेजर असतात गुंतवणूकदारांकडून फंडास अल्पसा मोबदला मिळतो.

एक्स्चेंज ट्रेडेड फंड (इटीएफ) - हा म्युच्युअल फंडासारखा शेअरबाजारात अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्याचा प्रकार असून तो गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडाच्या पेक्षा कमी व्यवस्थापन फी मध्ये अधिक तरल वेगळा प्रकार आहे.

स्थावर मालमत्ता - यातील गुंतवणुकीमुळे भाडे आणि भांडवल वृद्धी होऊ शकते. ती गुंतवणूकदारांच्या अप्रत्यक्ष उत्पन्नात मिळते. यातील मिळणाऱ्या लाभामध्ये ती मालमत्ता नेमकी कुठे आहे त्यानुसार फरक पडतो. स्थावर मालमत्तेतील आणखी जोखीम म्हणजे मालमत्ता हा प्रकार कमी तरल आहे.

मौल्यवान धातू - मौल्यवान धातू म्हणजे सोने चांदी इ यामुळे बरेचदा अडीअडचणीत पैसे उभे करण्यासाठी महागाईवर मात करण्यासाठी यात गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक प्रत्यक्ष धातुरुपात अथवा अप्रत्यक्षपणे इटीएफ स्वरूपात करता येते. या धातूंच्या भावावर आर्थिक परिस्थिती, भू राजकीय स्थिती आणि मागणी पुरवठा प्रभाव पडतो. mgpshikshan@gmail.com

Comments
Add Comment