सप्तशृंगगड : नांदुरी ते श्री सप्तशृंगगड घाटरस्त्यावर रविवारी ( दि.७) संध्याकाळी भाविकांची इनोव्हा कार सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन महिला आणि तीन पुरुष असे सहाजण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या दोन रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन दल, रोपवे कर्मचाऱ्यांचे पथक आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले असून दरीत बचावकार्य सुरू आहे. वाहन खोल दरीत कोसळल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यास मोठी अडचण येत आहे. दोरीच्या सहाय्याने आपत्ती व्यवस्थापन दल दरीत उतरून मोबाईलच्या प्रकाशात मृतदेह शोधण्याचे काम करत आहे. ७०० फूट खोल दरी असलेल्या भवरीनाळा धबधबा घाट परिसरात इनोव्हा कार चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनावरील ताबा सुटून ते लोखंडी संरक्षक कठड्यावर आदळले. कठडा कमकुवत असल्याने वाहन थेट दरीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच खासदार भास्कर भगरे आणि आमदार नितीन पवार यांनी प्रशासनाशी बोलून तातडीने मदतकार्य गतीमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सर्व मृत पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी
अपघातात ठार झालेल्या सर्वजण पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. किर्ती पटेल, रशीलाबेन पटेल, विठ्ठल पटेल, लता विठ्ठल पटेल, पचन पटेल, मनिबेन पटेल.
सार्वजनिक बांधकामवर कारवाईची मागणी
ग्रामपंचायत उपसरपंच संदीप बेनके आणि सदस्य राजेश गवळी यांनी घाटातील निर्दोष दुरुस्ती न केल्याचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभागावर (पीडब्ल्यूडी) मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.






