मुंबई : महाराष्ट्रात मागील कही दिवसांपासून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. वाघांचे, बिबट्यांचे नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या हल्ल्यात कोणी आपल्या घरचा कर्ता पुरुष गमावला आहे तर कोणी लहान मुले, घरातली कमावती माणसे गमावल्याने अनेकांची आर्थिक परिस्तिथी बिकट होत चालली आहे. गावागावांमध्ये नागरिक दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. काळोख पडू लागताच नागरिक दारं खिडक्या बंद करुन स्वतःला घरातच कोंडून घेऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाने महत्वाचा प्रस्तावावर विचार करत आहे.
वाघ अथवा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील एका नातलगाला सरकारी नोकरीचे देण्याच्या प्रस्तावावर गंभीरपणे विचार सुरू आहे. कुटुंबातील कर्ती माणसे गेल्याने आर्थिक वाताहत, मुलांचे शिक्षण, घरखर्च, शेती, कर्ज या जबाबदाऱ्यांची ओझी होतात. त्यामुळे संबंधित कुटुंबावर आलेला आर्थिक भर लक्षात घेता सरकार लवकरच या संदर्भात सकारत्मक निर्णय घेऊ शकते अशी माहिती वन विभागातील सूत्रांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत बिबट्या आणि वाघांच्या हालचाली वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी जनावरांवर हल्ले, तर काही प्रसंगी मानवांवरही हल्ले होऊन झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय नोकरीसंदर्भातला प्रस्ताव विचाराधीन असून लवकरच यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





