पुणे : बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यू प्रकरणी एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याऐवजी मरणासन्न अवस्थेत सोडून सदर चालक फरार झाला होता. इसाराईल गुर्जर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बाणेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. बाणेरमधील बालेवाडी फाटा चौकातून २० जुलैच्या सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास या ज्येष्ठ नागरिकाला रिक्षाने धडक दिली होती. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यावेळी रिक्षाचालक गुर्जर याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जातो, अशी थाप मारत स्वत: ची सुटका करुन घेतली. गुर्जरने रिक्षा गणेशखिंड रस्तामार्गे खडकीतील रेंजहिल्स परिसरात नेली. लोहमार्गाजवळील दाट झाडीत त्यांना सोडून गुर्जर फरार झाला. दरम्यान, ते गृहस्थ घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने बेपत्ता झाल्याची तक्रार बाणेर पोलीस ठाण्यात दिली. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह खडकीतील लोहमार्गाजवळ सापडला. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. रिक्षाचालक दिल्लीतील महिपालपूर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाणेर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले.