पुस्तक परीक्षण : डाॅ. रमेश सुतार
‘‘अभागी कळ्यांना ठेवून चितेवरी, द्या चुडा स्वप्नांना... हो भडाग्नी, अस्थी गंगाजळी अर्पण करूनी..., सुतक त्यांचे सुटेल देहीवरी...’’
‘जातगंगा : कौमार्य चाचणी प्रथा अभियान’ या भरत बेर्डे लिखित कादंबरीची सुरुवातच मुळात वरील काव्यपंक्तीने झालेली आहे. एखाद्या ज्वलंत सामाजिक विषयाला लेखकाने हात घातला आहे. याचा प्रत्ययच सुरुवातीच्या काव्यपंक्तीमधून वाचकास येतो. भरत बेर्डे यांची ही पहिलीच कादंबरी आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी कौमार्य चाचणीसारखा ज्वलंत प्रश्न वाचकांसमोर आणला. खरं तर त्यांचं खूप खूप कौतुक.
प्रस्तुत कादंबरी जळगाव जिल्ह्यामधील डोंगर कपारीत वसलेल्या ‘कंजार भाट’ या भटक्या-विमुक्त जमातीमधील अनिष्ट रूढी-परंपरांवर प्रकाशझोत टाकते. कादंबरीची सुरुवात लेखकाने फ्लॅशबॅक पद्धतीने केली आहे. कादंबरीच्या शेवटचा प्रसंग लेखकाने सुरुवातीलाच मांडला आहे. त्यामुळे समाजातील रूढी-परंपरांची जाचक दाहकता, मुलींच्या कौमार्य अवस्थेवर होणारे परिणाम आणि त्या अानुषंगाने पुरुषी समाजमनाची सामाजिक विषयाकडे पाहण्याची वृत्ती, याचा अंदाज आपल्याला सुरुवातीच्या प्रकरणावरून येतो.
कादंबरीचा नायक स्वानंद प्रभाकर जाकडे, एक प्रशिक्षित वायरमन जो सरकारी नोकरी करणारा आहे. त्याचे एका मुस्लीम समाजातील मुलीवर (कोहिनूर) प्रेम जडते. लेखक स्वत: नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे हा प्रेमप्रसंग रंगवताना आपण एखादा चित्रपट पाहत आहोत असा भास निर्माण होतो. एवढ्या सहजतेने लेखकाने नायक नायिकेमधील प्रेमप्रसंग रंगवला आहे. त्यासोबतच नायिकेच्या सौंदर्याचे वर्णनही लेखकाने तेवढ्याच ताकदीने कुठेही अश्लीलतेचा दर्प न येता रेखाटले आहे.
स्वानंदचे वडील प्रभाकर जाकडे आणि आई रुक्मिणी, तर भाऊ दिलीप आणि वहिनी लक्ष्मी. असे एकत्र कुटुंब असल्याचे सुरुवातीला आपल्याला कळते. स्वानंदचे वडील गावपंचायतीचे माजी सरपंच. जातीचा आणि समाजाचा प्रचंड अभिमान बाळगणारे आणि जुन्या चालीरीतींना (जरी जाचक असल्या तरी) प्राणापलीकडे जपणारे हेकेखोर, मग्रूर आणि अहंकारी व्यक्तिमत्त्व, तर दिलीप दादा आणि वहिनी प्रेमळ आणि जुन्या चालीरीतींना बदलत्या काळानुरूप गाढून टाकावे या विचारांची व्यक्तिमत्त्व. लहान भाऊ स्वानंदवर खूप प्रेम करणारे आणि त्याला वेळोवेळी मदत करणारे. मुस्लीम मुलीशी लग्न केलं तर बाप घरातून हाकलून देईल आणि जिवंत सोडणार नाही हे माहीत असूनदेखील भाऊ आणि वहिनी स्वानंदला रजिस्टर पद्धतीने लग्न लावण्यास मदत करतात. अर्थात बाप आणि गाव पंचायत मुस्लीम मुलीला ‘जातगंगा’ देऊन समाजात घ्यायला विरोध करतात. परिणामी दादाच्या सांगण्यानुसार स्वानंद आणि कोहिनूर दुरवरच्या गावात राहायला जातात. ‘जातगंगा’ म्हणजे कंजार भाट समाजामधील एक प्रकारचा विधी आहे. ज्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला समाजातून वाळीत टाकलेले असते त्यांना पुन्हा समाजामध्ये विधिवत प्रवेश दिला जातो. बहिष्कृत झालेली जर एखादी व्यक्ती असेल तर जातपंचायत बोलावून सर्व पंचांच्या समोर त्या व्यक्तीला हजर केले जाते आणि विशिष्ट मंत्राच्या जयघोषात त्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला स्वगृही प्रवेश दिला जातो. जग कितीतरी वेगाने प्रगती करीत आहे. लोक सुशिक्षित झालेले आहेत. तरीही अजून आपल्या भारतासारख्या देशात आपल्याला वंशाचा दिवा पाहिजे म्हणजे मुलगा पाहिजे ही वृत्ती सर्वच समाजातील लोकांमध्ये आपल्याला दिसून येते. यामध्ये सुशिक्षित समाजही मागे नसतो. आपल्या मुलाला मुलगा नाही म्हणून कितीतरी मुलींचा सासरच्या मंडळींकडून छळ झालेल्या आपण पाहतो. परिणामी सुनेलाच दोष देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त करायचं आणि मुलाचं दुसरं लग्न लावायचं अशा घाणेरड्या विचारांची माणसेही आपण पाहतो.
या कादंबरीमधील दिलीप दादाला २ मुली असतात आणि स्वानंदलाही दोन्ही मुलीच होतात. त्यामुळे स्वानंदच्या वडिलांना हे समजल्यावर वडिलांचा पारा चढतो आणि आपल्याला वंशाचा दिवा पाहिजे, मुलगा पाहिजे म्हणून स्वानंदचा बाप परस्पर समाजातील मुलगी बघून स्वानंदचे दुसरे लग्न जमवतो. आपल्या सुखी संसाराला बापाकडून कोणताही त्रास होऊ नये म्हणून स्वानंद आपल्या बायको-मुलींना माहिती न देता बाप जबरदस्ती करतो म्हणून दुसऱ्या लग्नाला तयार होतो. कादंबरीतील हा प्रसंग स्वानंदच्या बंडखोर वृत्तीला शोभणारा वाटत नाही. लग्न लागल्यानंतर कंजार भाट समाजातील ‘कौमार्य चाचणी’ या अनिष्ठ रूढीला तो सामोरा जातो.
या प्रथेप्रमाणे लग्नानंतर नवरानवरी शरीरसंबंध ठेवतात त्यावेळी सफेद चादरीवर रक्त दिसले नाही तर मुलगी ‘छिनाल’ आहे असे समजून मुलीला लाथाबुक्क्यांनी मारले जाते. तिच्या परिवारातील सर्वांना हाणले जाते आणि त्या परिवाराचे घरदार उद्ध्वस्त करून गाव सोडायला भाग पाडले जाते. अशा मुलीशी समाजातील कोणीही व्यक्ती लग्नाला तयार होत नाही. त्यानंतर तिला कोणाच्या तरी माडीवर धंद्याला बसावं लागतं. कादंबरीतील स्वानंदच्या दुसऱ्या लग्नाच्या वधूला अशा क्रूर पद्धतीने गावातून हाकलून दिले जाते. ‘काैमार्य चाचणी’ ही प्रथा फक्त महाराष्ट्रातच आहे असे नाही तर भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्येही काही समाजात पिढीजात परंपरा म्हणून ही प्रथा कवटाळली जातेय. शिक्षित व्यक्तींनी अशाप्रकारच्या चालीरीतींच्या विरोधात आवाज उठविणे आवश्यक आहे. कालांतराने जसजशी कादंबरी पुढे सरकते तसतसे गावकऱ्यांचे घरातील इतर माणसांचे स्वभाव तसेच समाजातील इतर चालीरीतींची माहिती उलगडत जाते. जातगंगा देण्यासंबंधीचा अजून एक प्रसंग लेखकाने या कादंबरीमध्ये चित्रित केला आहे. स्वानंदची मोठी मुलगी सुशिक्षित असूनसुद्धा केवळ तिची आई मुस्लीम आहे, समाजाने स्वानंदच्या कुटुंबाला वाळीत टाकलंय त्यामुळे सुशिक्षित वरपित्याच्या आग्रहावरून जातगंगा द्या म्हणून समाजाकडे विनवणी करते हा प्रसंग लेखकाने मोठ्या ताकदीने मांडला आहे. प्रसंगी मुलीच्या तोंडी डायलाॅग दिले आहेत. त्यामुळे तोही प्रसंग चित्रपटासारखा भासतो.
पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेमध्ये काही समाजामध्ये परंपरेने घालून दिलेले जोखड शीतल शिक्षित असून सुद्धा सोडू शकली नाही. गर्विष्ठ आजोबाला शिक्षणाचे महत्त्व सांगून सुद्धा आजोबाच्या मनाला पाझर फुटला नाही. परिणामी शीतल आत्महत्या करून आपले जीवन संपवते.
काही भटक्या-विमुक्त जमातींमध्ये पिढीजात परंपरेने आलेल्या चालीरीती आणि श्रद्धा यांच्या आहारी आजही काही सुशिक्षित जातात, तर समाजातील काही मोजकेच सुशिक्षित लोक या अनिष्ठ रूढी-परंपरेविरुद्ध आवाज उठवतात. याच समाजातील एक सुशिक्षित तरुण सध्या कौमार्य चाचणी आणि या समाजातील रूढी-परंपरा याविरुद्ध जनजागृती करीत आहे. त्याने ‘stop the V-ritual’ या नावाने एक ग्रुप तयार केला असून त्या ग्रुपच्या माध्यमातून तो आवाज उठवतोय. असे समाजातील सुशिक्षित तरुण-तरुणी जोपर्यंत आपल्या समाजातील अनिष्ठ रूढी आणि अंधश्रद्धांविरुद्ध आवाज उठवणार नाही तोपर्यंत कोणताही समाज आपली प्रगती करू शकणार नाही. अंधश्रद्धाविरोधी कायद्याच्या आधारे अशा प्रकारच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथा-परंपरा जोपर्यंत बंद केल्या जात नाहीत तोपर्यंत या समाजातील अंधश्रद्धांच्या विळख्यात अडकलेल्या कोमल कळ्यांचे अश्रू पुसले जाणार नाहीत. अजूनपर्यंत कित्येक मुलींची संसार करण्याची स्वप्ने उद्ध्वस्त झाली असतील. इतर समाजातील सुशिक्षित युवापिढीनेही याविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे.
लेखक भरत बेर्डे यांनी आपल्या या कादंबरीमधून परंपरागत चालत आलेल्या ‘कौमार्य चाचणी’ या क्रुप्रथेला वाचा फोडली. स्वानंदची उच्चशिक्षित मुलगी ‘शीतल’ हिच्या माध्यमातून शिक्षित आणि अशिक्षित यांच्या विचारांमधील तफावत आजोबांशी झालेल्या संभाषणामधून अधोरेखित केली आहे. प्राण गेला तरी परंपरागत चालत आलेल्या रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, चालीरिती न सोडण्याची अशिक्षितांची जिद्दी, कर्मठ वृत्ती आणि या प्रथांना विरोध करणाऱ्या उच्चशिक्षित स्वानंदच्या मुली यांच्यामधील द्वंव लेखकाने व्यवस्थित रेखाटले आहे. उच्च शिक्षणामुळे शीतलच्या विचारामध्ये आलेली प्रगल्भता लेखकाने संयत पद्धतीने मांडली आहे. या कांदबरीमध्ये एकूण ३४ प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी तर काही वेळा प्रकरणाच्या मधेच प्रसंगानुसार लेखकाने चारोळ्या पेरलेल्या आहेत, त्यामुळे त्या त्या प्रकरणातील समर्पक माहिती चारोळ्यांमुळे वाचकाला कळते. ‘जातगंगा : कौमार्य चाचणी अभियान’ ही कादंबरी मराठी साहित्य विश्वात नक्कीच आपलं वेगळं स्थान निर्माण करेल यात शंका नाही.
कादंबरीचे नाव : जातगंगा : कौमार्य चाचणी प्रथा अभियान लेखक : भरत पंढरीनाथ बेर्डे पृष्ठे : १९२ प्रकाशक : संधीकाल प्रकाशन






