Sunday, December 28, 2025

सारखा काळ चालला पुढे...

सारखा काळ चालला पुढे...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

एकेकाळी सिनेमा सुरू होताच पूर्ण पडदा व्यापणारे शब्द ‘दिग्दर्शन – अनंत माने’ वाचायची प्रेक्षकांना सवयच झाली होती. ‘धाकटी जाऊ’, ‘अवघाची संसार’, ‘मानिनी’, ‘आई उदे गं अंबाबाई’, ‘बंधन’, ‘अशीच एक रात्र होती’, ‘चिमण्यांची शाळा’, ‘जगावेगळी प्रेम कहाणी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘कुलस्वामिनी अंबाबाई’, ‘सुशीला’, ‘शुभमंगल’, अशा एकापेक्षा एक, ६० सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्यांना मराठीत अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या तमाशापटांचा राजा म्हणत.

‘केला इशारा जाता जाता’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘लावण्यवती’, ‘गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं’, ‘गणगौळण’, ‘कलावंतीण’, ‘सांगते ऐका’, ‘सवाल माझा ऐका’, हे अनंत मानेंचेच सिनेमे! कोल्हापुरात तब्बल एकाशे दहा वर्षांपूर्वी (१९१५) जन्मलेल्या अनंतरावांनी वयाच्या १५व्या वर्षीच ‘प्रभात’मध्ये संकलक म्हणून काम सुरू केले. व्ही. शांताराम आणि ‘प्रभात’ यांनी मिळून ‘सैरंध्री’ हा भारतातला पहिला रंगीत बोलपट बनवला तेव्हा योगायोगाने त्यांना या चित्रपटात ‘विष्णू’ची भूमिका करण्याची संधी मिळाली. पुढे हा बुद्धिमान कलाकार स्वत:च एक कमालीचा यशस्वी दिग्दर्शक बनला पण गुरूचे ऋण मानणाऱ्या अनंतरावांनी ‘पिंजरा’(१९७२)मध्ये व्ही. शांताराम यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. कारण ते शांतारामबापूंना गुरू मानत असत.

अनेक मोठमोठ्या दिग्दर्शकांबरोबर कामाचा अनुभव घेतल्यावर त्यांनी स्वत:ची ‘चेतन चित्र’ नावाची संस्था स्थापन केली. त्यांचा पहिला चित्रपट होता सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारा ‘पायदळी पडलेली फुले’ (१९५६). तो फारसा चालला नाही हे दुर्दैव! पण पुढे त्यांनी १९५७ साली दिग्दर्शित केलेल्या ‘धाकटी जाऊ’ या चित्रपटाला केंद्र शासनाचे प्रादेशिक भाषेतले पहिले पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीतला महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘सांगत्ये ऐका’. या चित्रपटाने एकाच चित्रपटगृहात १३१ आठवडे चालण्याचा विक्रम केला.

एकापाठोपाठ शासकीय पुरस्कार आणि कमालीची लोकप्रियता मिळवत त्यांचा विजयरथ पुढेच जात राहिला. ‘शाहीर परशुराम’ (१९६१) आणि ‘मानिनी’ (१९६२) या चित्रपटांसाठी केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचे त्यांना पारितोषिक देऊन गौरविले होते. असाच त्यांचा ‘दोन घडीचा डाव’ नावाचा सिनेमा आला होता १९५८ला. यात प्रमुख भूमिका केल्या होत्या सीमा, राजा गोसावी, स्मिता कदम, शरद तळवलकर, दामूअण्णा मालवणकर, इंदिरा चिटणीस, वसंत शिंदे, भगवान, लीला गांधी यांनी. सोबत होते मांजरेकर, जावडेकर, राम यादव आणि गोपाळ टाकळकर. एरव्ही मानेंच्या बहुतेक चित्रपटाचे गीतकार असायचे जगदीश खेबुडकर. त्यांच्या तमाशापटासाठी जी खास ग्रामीण बोली आणि ठसकेबाज लावण्या, सवाल-जवाब लागत त्यात खेबुडकर यांचा हातखंडा होता!‘दोन घडीचा डाव’ या चित्रपटात मात्र फक्त दोनच गाणी होती. ती लिहिली होती शांताबाई शेळके यांनी.

‘शब्द धावती स्वरामागुनी, ताल धरी पखवाज, सूर लागला आज’

हे पंडित वसंतराव देशपांडे आणि आशा भोसले यांनी गायलेले गीत आणि ‘सारखा काळ चालला पुढे’ हे वसंत पवार यांच्या संगीत दिग्दर्शनात चक्क मन्ना डे यांनी गायलेले गाणे शांताबाईंच्या लेखणीतून उतरले होते. संस्कृतच्या पंडित असलेल्यास शांताबाईंचा पिंड मुळातच तत्त्वज्ञानीक होता. त्यामुळेच ‘सारखा काळ चालला पुढे’ कोणत्याही काळात कुणालाही दिलासा देणारे गीत बनले.

मन्नादांच्या दमदार पहाडी आवाजात जेव्हा गाण्याची पहिली ओळ कानावर पडते तेव्हा काहीतरी चांगले ऐकायला मिळणार याची खात्री वाटू लागते. जीवनाचे सार्वकालिक वास्तव सांगतानाच मनाला एक आगळा दिलासा देणारे शांताबाईंचे ते शब्द होते -

“विश्वचक्र हे अविरत फिरते, मरणामधुनी जीवन उरते, अश्रू आजचे उद्या हासती नवल असे केवढे! सारखा काळ चालला पुढे.”

पुढे त्या एक कटू सत्य सांगतात तेही फक्त दोन ओळीत -

“कुणाचे कोणावाचून अडे, सारखा काळ चालला पुढे.”

किती अंतिम सत्य! या भूतलावर काहीही झाले, कितीही नैसर्गिक आपत्ती आल्या, कितीही राजवटी बदलल्या, साम्राज्ये स्थापन निर्माण झाली, संपली, तरी काळ काही थांबत नसतो. तो सारखा पुढेच जात राहतो. आजच्या विनाशातून उद्याची नवनिर्मिती होत राहते.

प्रचंड वादळानंतर मोठमोठे वृक्ष कोसळतात, धाराशाही होतात. पण पुन्हा त्यांनाच पालवी फुटते. मोठमोठ्या इमारती कोसळल्यावर अनेक माणसांचे मृत्यू झाले तरी कुठेतरी जमिनीखाली एखादे तान्हे बाळ जिवंत सापडते. आजूबाजूला उभे असलेल्यांच्या चिंतेने काळवंडलेल्या चेहऱ्यांवर आनंदाचे हसू उमटते. मृत्यूच्या प्रचंड तांडवानंतरही जीवन शिल्लक राहते. आई नसलेल्या त्या बाळाचाही सांभाळ कुणीतरी करते. ही वस्तुस्थिती चार ओळीत सांगितल्यावर शांताबाई आपल्याला निसर्गातली बिनतोड उदाहरणे देतात -

“शिशिर नेतो हिरवी पाने, झाड उभे हे केविलवाणे, वसंत येता पुन्हा आगळा साज तयावर चढे, सारखा काळ चालला पुढे.”

शिशिरातल्या पानगळीमुळे उघडीबोडकी झालेली झाडे वसंतात पुन्हा बहरतात, फुलतात हाच तर जीवनाच्या शाश्वततेचा पुरावा असतो. काळ सारखा पुढेपुढेच जात राहतो. ज्यांच्याबरोबर आयुष्यभराची मैत्री होती, प्रेम होते कधी कधी तेही पुढे निघून जातात. प्रियजनांच्या ताटातुटीचे कितीही दु:ख झाले तरी कुणाला कुणासाठी थांबता येत नाही.

“श्रेष्ठ वीरनर इथे जाहले, रामकृष्णही आले गेले, जग हे अडले त्यांच्यासाठी, असे न केव्हा घडे, सारखा काळ चालला पुढे.”

अनेकदा शांताबाईंच्या ओळी सुभाषितासारख्या येतात. ज्याला मृत्यू आला आहे तो सर्व सोडून जातो पण कितीही प्रिय असला तरी कुणी त्याच्याबरोबर हे जग सोडून जाऊ शकत नाही. शेवटी शोकालाही एक मर्यादा पाळावीच लागते, दु:खातून सावरावे लागते. जीवनाच्या प्रवाहात मूकपणे सामील व्हावेच लागते. सततचा शोक शक्यही नसतो आणि चांगलाही नसतो.

“मरणारा तो जगास मुकतो, त्याच्यामागे कुणी न जातो, दु:ख उरी ते कवटाळूनी या, नित्य कुणी का रडे, सारखा काळ चालला पुढे.”

आपलेच पाहा ना, २०२४ साल ‘आले आले’ म्हणता कधी गेले कळलेही नाही. आताचे २०२५ हातातून निसटत चालले आहे. फक्त तीन आठवड्यांनी आपण २०२५ हे शब्द असलेली तारीख ‘आजची’ म्हणून कधीही लिहू शकणार नाही. अलीकडे तर अचानक काळाला अनैसर्गिक वेगच आलाय की काय असे वाटू लागले आहे. डिसेंबर महिन्यात एक वेगळीच हुरहूर जाणवत राहते. त्यावेळी शांताबाईंचे शब्द मनाला केवढा दिलासा देतात की “शिशिराने आयुष्यातली सगळी हिरवी पाने नेली तरी लवकरच वसंत येणार, जीवनवृक्षाला पुन्हा हिरवी कोमल पालवी फुटणार!

Comments

Anjali Konkar    December 7, 2025 12:16 AM

Chan lekhan

अंजली कोनकर    December 7, 2025 12:15 AM

या वर्षाच्या शेवटच्या सरत्या दिवसात थोडी हुरहूर आणि बरीचशी आशा देणारे हे गीत तुम्ही निवडलेत आणि त्यावर लिहिलेले भाष्य सुद्धा दिलासादायक असल्याने वाचनातून आनंद मिळाला. आवडला लेख.

Add Comment