Sunday, December 7, 2025

Pune Press Club : पुणे प्रेस क्लबसाठी सेनापती बापट मार्गावर प्रशस्त जागा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय!

Pune Press Club : पुणे प्रेस क्लबसाठी सेनापती बापट मार्गावर प्रशस्त जागा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय!

* महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

* आठ हजार चौ.फुटावर सुसज्ज इमारत उभारणार

नागपूर : पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या प्रेस क्लबसाठी सेनापती बापट रस्त्यावरील सुमारे साडेआठ हजार चौरस फूट जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आला. पुणे येथील पत्रकारांची याबाबतीची मागणी आज पूर्ण झाली. या जागेवर सुसज्ज अशी अतिशय प्रशस्त इमारत बांधली जाणार आहे.

सुमारे ८०१५.०७ चौरस फूट (७४४.६२ चौ.मी.) असलेली ही जमीन पुणे शहरातील (मौजे भांबुर्डा, टी.पी.१ अंतिम भूखंड क्र.८८१/ए ) आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४०, तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट लावणे) नियम, १९७१ मधील नियम ५० व ५१ मधील तरतूदीनुसार जमिनीची प्रचलित शिघ्रसिद्धगणकानुसार येणारी किंमत वसूल करून वाणिज्यिक या प्रयोजनाकरिता भोगवटदार वर्ग-२ या धारणाधिकाराने कब्जाहक्काने अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रदान करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णयानंतर सांगितले की, पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या माध्यमातून पत्रकारांचे कौशल्य विकसनासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण, उपक्रम, पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन, अभ्यास दौरा, वैद्यकीय तपासणी, पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप, महिला सभासदांसाठी क्षमता विकसन, व्याख्याने, वार्तालाप आदी कल्याणकारी कार्यक्रम वर्षभर राबविले जातात. मागील काही वर्षामध्ये संस्थेच्या कामाचा व्याप वाढला आहे. माध्यमांच्या विस्तारामुळे सभासद संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी व क्षमता विकसन उपक्रम, हेल्थ क्लब राबविण्यासाठी सध्याची संस्थेची जागा अपुरी पडत आहे. प्रतिष्ठानतर्फे आयोजित विविरस्त्यावरील व्याख्यानांसाठी केंद्र व राज्य स्तरावरील मंत्री, न्यायाधीश, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, जेष्ठ संपादक-पत्रकार आदी मान्यवर संस्थेत येतात. त्यामुळे संस्थेला नवीन जागेची नितांत आवश्यकता असल्याने ही जागा त्यांना देण्यात आली आहे.

Comments
Add Comment