नाशिक : सप्तशृंगी गडावरील गणपती घाटात इनोव्हा कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. सुमारे १००० ते १२०० फूट खोल दरीत वाहन पडल्याने दोन महिलांसह सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कारमध्ये एकूण सात जण होते, त्यापैकी एक गंभीर जखमी आहेत.
नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी गडावरून एक वाहन कोसळून झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तेथे…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १५ बीएन ०५५ ही इनोव्हा कार दुपारच्या सुमारास सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात असताना नियंत्रण सुटून दरीत कोसळली. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. स्थानिकांच्या मदतीने आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहाय्याने दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. घाटातील संरक्षक भिंतींची कामे अपूर्ण असल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, भाविकांच्या वारसांना पाच लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.






