Thursday, January 15, 2026

धक्कादायक! चक्क पोलिसांच्या घरी चोरी, काय आहे नेमकं प्रकरण?

धक्कादायक! चक्क पोलिसांच्या घरी चोरी, काय आहे नेमकं प्रकरण?

बुलढाणा: बुलढाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरीचा गुन्हा करणाऱ्या चोरट्यांना धडा शिकवण्याचे काम करणाऱ्या पोलिसांच्या घरातच चोरी झाल्याचे समोर आले आहे. एक, दोन नाही तर तब्बल पाच पोलीसांच्या घरातील सोने आणि रोख रक्कम चोरांनी लंपास केली आहे. पोलिसांच्या घरातच चोरी झाल्याचा प्रकार घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे बुलढाणा शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची चर्चा सुरू आहे. चोरी सोडून बुलढाण्यात रोज नवनवीन गुन्हेगारीच्या घटनांनी सुद्धा डोके वर केले आहे. त्यामुळे बुलढाण्यातील सर्वसामान्य नागरिक भयभीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी बुलढाणा शहरातील पोलिस वसाहतीमधील पाच पोलिस कर्मचाऱ्यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश करत चोरी केली. चोरांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरली आहे. या प्रकरणामुळे जनतेच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीसांचीच घरे सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आला आहे. आयएसआय गजानन वारे, पोलिस हेड कॉन्स्टेबल रिंढे, पोलिस कॉन्स्टेबल रुबीना शेख, पोलिस कॉन्स्टेबल ठाकूर यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून लाखो रुपयांचा मुद्देमाल व रोख चोरली. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूलाच ही चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस सुद्धा सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.

Comments
Add Comment