पुणे : श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती अचानक खालावली असून त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांनी माहिती दिली असता. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या टीमकडून सातत्याने उपचार सुरू आहेत.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पूना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करत आहे. वयामुळे आणि एकूण आरोग्यस्थितीचा विचार करून डॉक्टर सर्व प्रकारची काळजी घेत आहेत.
डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जाते. ‘एक गाव, एक पाणवठा’ सारख्या उपक्रमांपासून असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला लढा प्रचंड चर्चेत राहिला. समाजातील कष्टकऱ्यांसाठी त्यांनी दीर्घकाळ केलेले कार्य आजही आदर्श मानले जाते.






