प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
‘विष’ हा विषय? बापरे! आजच्या विषयाचे नाव बघून थोडसे घाबरायलाच होतंय ना? पण कोणते विष? विषाचा परिणाम हा नेमका किती आणि कसा होतो? विषाने माणूस मरतो का? असंख्य प्रश्नांची गर्दी मनात जमा झाली ना...? चला तर थोडंसं विषाबद्दल जाणून घेऊया.
अलीकडेच ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे यांची एक मुलाखत ऐकली. त्यात ते म्हणाले, की माझी आई आधुनिक संत आहे. तिने मला विष याविषयी काय सांगितले बघा. एक चमचा विष घेतले आणि ते एक ग्लास पाण्यामध्ये टाकले आणि ते पाणी प्यायलो तर माणूस हमखास मरणार. हेच एक चमचा विष हे पिंपभर पाण्यात टाकले तर तो माणूस निश्चितपणे मरणार नाही फक्त त्याला थोडाफार त्रास होऊ शकतो; परंतु हेच एक चमचा विष जर समुद्रात टाकले तर मासेसुद्धा मरणार नाहीत. यातून तिने इतका सुंदर बोध मला दिला की विष आहेच आपल्या आसपास; परंतु आपल्याला समुद्र होता आलं पाहिजे. ते गिळंकृत करून जगता आलं पाहिजे!
ही मुलाखत जेव्हा मी ऐकत होते तेव्हा मला माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवली. आमच्या शेजारच्या घरात एक साप शिरला होता. तो साप एका लहान मुलाला चावला. तसा तो ओरडत उठला. त्याचे वडील पळतच त्या मुलाकडे आले, की तो का ओरडतोय. त्यांनी त्याचे पांघरून बाजूला केले पण हे पांघरून बाजूला करताना कदाचित त्यांनी सापावर पाय दिला असेल किंवा त्यांचा हात त्याच्यावर पडला असेल! ते कोणालाच माहीत झाले नाही; परंतु तो साप त्यांना चावला. आपल्याला साप चावतोय हे दृश्य त्या माणसाने व्यवस्थित पाहिले. तोही ओरडायला लागला आणि घरातले सगळे उठले. तो आठ वर्षांचा मुलगा रडत होता. हा माणूस मात्र म्लान होऊन खाली पडला. सगळ्यांच्या लक्षात आले, की हा साप दोघांनाही चावला आहे. त्या दोघांनाही घाईघाईने उचलून दवाखान्यात नेले. दवाखान्यात पोहोचल्यावर लक्षात आले, की तो माणूस मरून गेलेला आहे तर त्या लहान मुलांना प्राथमिक उपचार करून ताबडतोब घरी पाठवले. त्या दोघांनाही तपासताना, त्याच्या पायावरच्या खुणा बघून डॉक्टरांच्या लक्षात आले, की तो साप पूर्णपणे बिनविषारी होता. म्हणजे तो माणूस सापाच्या विषामुळे नाही तर सापाला घाबरून मरून गेला होता. म्हणजे मरणाचे कारण ‘विष’ नव्हते; परंतु आपल्या मनात अगदी लहानपणापासून साप चावला की विष शरीरात भिनते आणि माणूस मरतो, असे कोणीतरी मनात भरवलेले असते.
आपण फक्त भारतापुरता विचार केला तर इथे एकंदरीत असणाऱ्या सापांमध्ये ऐंशी टक्के साप बिनविषारी असतात. तसे शाळेच्या पुस्तकात वाचल्याचे आठवतेय, की साप माणसांना इजा तर करत नाहीतच उलट पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. तसाही साप विषारी असो की बिनविषारी, त्याला आपला चुकून किंवा मुद्दाम धक्का लागला तरच आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो चावतो, मुद्दाम आपल्याला शोधत येत चावत नाही.
आपण त्रासदायक उंदीर, झुरळ, ढेकूण, उवा किंवा शेतातील अन्नधान्यांवर पडणाऱ्या अळ्या, कीटकांसाठी वगैरे सर्रास कीटकनाशके वापरतो आणि त्यांच्या उपद्रवांपासून काही काळ शांती मिळवतो; परंतु ते परत परत निर्माण होत राहतात आणि परत परत आपल्याला कीटकनाशके वापरावी लागतातच! त्याप्रमाणे आपल्या आसपासची माणसेसुद्धा अत्यंत गोड बोलणारी असू शकतात.
पण त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रचंड विष साठलेले असू शकते. अशा वेळेस आपण नेमके काय करायचे? एखादा माणूस वाईट आहे किंवा आपल्याविषयी वाईट विचार करतो आहे, तर आपण त्याच्यापासून दूर होऊ शकतो; परंतु तो दूर गेला तरी आणखी कोणी त्याच प्रवृत्तीचा असायची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शरद पोंक्षे यांच्या आईने सांगितल्याप्रमाणे आपल्या विषयीची वाईट वृत्ती किंवा नकारात्मकता बाळगलेल्या माणसांमुळे होणारे त्रास कमी करण्यासाठी आपल्या मित्रपरिवारामध्ये खूप साऱ्या चांगल्या माणसांना आपणच जोडले पाहिजे. चांगले विचार ऐकले पाहिजेत. चांगल्या कामांमध्ये स्वतःला झोकून दिले पाहिजे. यामुळे आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असणाऱ्या वाईट माणसांच्या मनातील आपल्यावर होणारा वाईट विचारांच्या विषाचा प्रभाव अगदी नगन्य (Negligible) होऊन जाईल!
pratibha.saraph@ gmail.com