Sunday, January 11, 2026

गुरूंचे गुरू

गुरूंचे गुरू

विशेष : संजीव पाध्ये

मुंबईचं क्रिकेट म्हटलं की डोळ्यांसमोर नाव येतं ते आचरेकर सरांचं. सचिन तेंडुलकरसारखा महान खेळाडू तर त्यांनी घडवलाच; पण अमोल मुजुमदारसारख्या आणखी कितीतरी हिऱ्यांना त्यांनी पैलू पाडले. आचरेकर सरांची गेल्या आठवड्यात जयंती होती. त्यानिमित्ताने त्यांनी क्रिकेटला दिलेल्या योगदानाची पुन्हा एकदा आठवण.

भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेता झाल्यावर या संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचं सुद्धा कौतुक होतंय. त्यांनी मात्र आपल्याला गुरू द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर यांच्यासारखे गुरू लाभल्याने आपण आजवरची मजल मारल्याचं स्पष्ट केलं आहे.

खरंय, आचरेकर सरांची पारखी नजर होती आणि त्यांचं अंतर्मन त्यांना अचूक कौल देत असायचं म्हणून त्यांनी घडवलेले नुसते चांगले क्रिकेटपटू झाले नाहीत, तर त्यातील बरेच जण पुढे चांगले प्रशिक्षक झाले. त्यांनी ही रत्नं बरोबर निवडली होती. आता आपण अमोलचंच उदाहरण बघतोच आहोत. या खेरीज त्यांनी पुढे आणलेल्यापैकी लालचंद राजपूत घ्या, २००७ ला धोनीच्या भारतीय संघाने पहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली, त्या संघाचा तो प्रशिक्षक होता. मानखुर्दमधल्या गरीब वस्तीतला हा मुलगा त्याचं क्रिकेट बघून सरांनी त्याच्या वडिलांना नोकरी नक्की लावून देईन या वचनावर क्रिकेटपटू केला आणि तो कसोटीपटूही झाला आणि चांगला प्रशिक्षक सुद्धा.

चंदू पंडितची सुद्धा हीच कहाणी. त्याचे वडीलसुद्धा त्याला क्रिकेटमध्ये आणू पाहत नव्हते. सरांनी त्यांना सुद्धा मुलाच्या नोकरीची हमी दिली तेव्हा चंदू क्रिकेटपटू झाला आणि भारताकडूनही खेळला. नंतर कल्पक प्रशिक्षक म्हणून आजही त्याचंं नाव गाजत असतं. मुंबईला तर त्याने रणजी करंडक मिळवून दिलाच, पण नंतर मध्य प्रदेश, विदर्भ अशा संघाच्या बाबतीतसुद्धा त्याने ही किमया साधून दाखवली. आय. पी. एल. प्रतिष्ठेची झाल्यावर केकेआरला सुद्धा त्याने अजिंक्य करून दाखवलं. प्रवीण अमरेचे तर सर संपूर्ण मार्गदर्शक होते. त्याला मुंबई सोडून रेल्वेकडे त्यांनी पाठवले आणि त्यामुळे तो सुद्धा कसोटी क्रिकेट खेळला. नंतर तो सुद्धा आज एक मोठा प्रशिक्षक म्हणून ख्याती मिळवून आहे. मुंबईसाठी आणि आय. पी. एल. मधल्या दिल्ली संघासाठी तो यशस्वी राहिला आहे. विशेष म्हणजे अनेक जण भारताकडून खेळत असताना फलंदाजीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला की त्याचा सल्ला घेऊन पुन्हा धावा काढताना दिसले आहेत. यष्टीरक्षक म्हणूनच प्रयत्न करत राहा अशी सारखी पाठ काढूनही, गोलंदाजीचा सराव करताना पाहून पाठीवर सरांनी स्टंप हाणल्यावर गुपचूप यष्टिरक्षकाकडे वळणारा समीर दिघे देखील यष्टीरक्षक म्हणूनच भारतीय संघात निवडला जाऊ शकला होता. त्याने सुद्धा प्रशिक्षक म्हणून पुढे छाप पाडून झाली आहे. आणखी यष्टीरक्षण करणारे सुलक्षण कुलकर्णी आणि विनायक सामंत यांनी सुद्धा आज प्रशिक्षकाच्या भूमिकेत ठसा उमटवला आहे. सरांचा ज्याच्यावर सर्वाधिक विश्वास असायचा आणि त्याला त्यांनी मॉनिटर’सारखा नेमला होता,तो बलविन्दर संधू सुद्धा भारताकडून खेळला, कपिलच्या विश्वविजेता संघाचा सदस्य राहिला आणि निवृत्त झाल्यानंतर मुंबईसाठी यशस्वी प्रशिक्षक सुद्धा झाला. सध्याचा भारताचा निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर हा सुद्धा सरांच्या शिष्यांपैकी एक आहे. सरांच्या आग्रहाखातर त्यांच्या बरोबर टेनिस क्रिकेट खेळता खेळता त्यांचा शिष्य होत भारतीय संघात निवडला जाण्याएवढी सर्वात पहिल्यांदा मजल मारणारा होता तो रामनाथ पारकर ! जाम्बोरी मैदानावरून सरांमुळे थेट सुनील गावसकरबरोबर भारतासाठी खेळताना तो दिसला होता. एक उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणूनही तो चमकला. तो सुद्धा नंतर वेन्गसरकर अॅकॅडमीत प्रशिक्षक म्हणून गाजला होता.

सरांचा दत्तक पुत्र नरेश चुरी, तर सरांच्या शारदाश्रम शाळेचा वारसा, एक चांगली रणजी कारकीर्द संपल्यावर प्रशिक्षक म्हणून चालवताना दिसला. सरांच्या आणि नरेशच्या तालमीत तयार झालेला अभिषेक नायर तर आज देशातील अव्वल प्रशिक्षकांपैकी एक आहे. सर्वात आगळंवेगळं उदाहरण तर दिनेश लाड यांचं आहे. सरांनी कपडे, बूट दिल्यामुळे क्रिकेट खेळू शकलेली ही व्यक्ती सरांसारखाच गुरू द्रोणाचार्य पुरस्कार मिळविण्याएवढी मोठी झाली. म्हणजे आचरेकर सर खरोखर गुरूंचे गुरू म्हणायला हवेत आणि सर्वात महत्त्वाची त्यांनी दिलेली देणगी म्हणजे भारत रत्न सचिन तेंडुलकर! क्रिकेटचा देव म्हणून त्याला आता संबोधले जाते. सरांना देवगुरू म्हटलं तर वावगं ठरू नये. ३ डिसेंबर सरांची जयंती झाली. त्यांना ही आदरांजली.

Comments
Add Comment