Saturday, December 6, 2025

मैत्रीण नको, आईच होऊया!

मैत्रीण नको, आईच होऊया!

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू

असं म्हणतात की, आपली मुलगी आपल्या खांद्यापर्यंत उंचीने पोहोचली आणि आईचे कपडे, चपला, पर्स, दागिने, कदाचित मेकअपचं सामान वापरायला लागली, आईला कामात मदत करायला लागली, आईची काळजी घ्यायला लागली, मोठी बहीण म्हणून धाकट्या भावंडांकडे लक्ष द्यायला लागली की ती आता मोठी झाली आहे असं समजा. टीनेजर मुलींशी मैत्रिणीसारखे वागा असं आपण ऐकत असतो. पण मैत्रीण बनणं या वयात सोपं नाही कारण टीनेजमध्ये आलेल्या मुलींशी आईचे संवादापेक्षा वाद जास्त होतात. डिस्कशनपेक्षा भांडणं जास्त होतात. बोलूया म्हटलं की, आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. आपल्या दोघींच्या बोलण्यात हास्य-विनोदाची कारंजी फुलण्या ऐवजी लेक्चरबाजी जास्त होते.

आज जरी हे होत असलं तरी एके दिवशी मुलीला हे कळेल की, तुम्ही नेहमीच तिच्या बाजूने होता. तिच्या आनंदात तुमचा आनंद होता. तिच्या दुःखी होण्याने तुम्ही दुःखी होत होतात. तुमच्या मनात असणारी भीती, वाटणाऱ्या आशा-आकांक्षा यावर जसजशी ती मोठी व्हायला लागेल तसतसं तुम्ही बोलू शकाल. तुम्ही दोघी तिची स्वप्नं, तिचं अपयश यावरही चर्चा कराल. मनमुराद हसाल, अगदी हसून हसून डोळ्यांत पाणी येईपर्यंत. आईच्या कुशीत शिरताना तिला ऑकवर्ड वाटणार नाही. एक दिवस तिला कळेल की, तिला निराश करताना तुमचं मन किती दुखावलं गेलं होतं. ते सोपं नव्हतं अजिबात तुमच्यासाठी तिच्या मनाविरुद्ध करणे. ती खरं म्हणजे काळीज आहे तुमचं. तिला सुरक्षित ठेवण्यासाठी काहीही करायला तुम्ही तयार होतात पण आज तुम्हाला तिची मैत्रीण नाही तर आईच व्हायला हवं. अजून काही दिवस, महिने, वर्ष जायला हवीत.

मुलगी अजाण आहे. अवघड, निसरड्या, अवखळ वयात आहे. तोवर तुम्हाला तिच्या आईच्याच भूमिकेत जगायचं आहे. प्रेम नक्कीच करायचंय पण तिच्यासाठी काही मर्यादा आखाव्या लागणार आहेत. तुम्ही ठरवलेले नियम तिला आवडणार नाहीत पण हे करणं आणि तेही सीरियसली हे तुमचं कर्तव्य आहे. चुकीच्या वेळेस केलेला मागण्या, चुकीच्या गोष्टींसाठी केलेला हट्ट यांना नाही म्हणावं लागेल.

ते तुमचं तुमच्या मुलीवरचं प्रेम होतं हे काही वर्षांनी तिला समजेल. कळेल की आपली आई नाही म्हणाली पण त्यापेक्षा खूप जास्त गोष्टींना ती हो म्हणाली आहे. का असं नाही म्हणाली ती कारण त्या वेळेला ते तुमच्या मुलीच्या कल्याणासाठी होतं. आज कदाचित तिला वाटत असेल की तिच्या निवड केलेल्या मित्र-मैत्रिणीबद्दल, गोष्टींबद्दल, स्क्रीन टाईमबद्दल, सोशल मीडियावरील तिच्या वावराबद्दल तुम्ही खूप शंका घेत आहात. प्रश्न विचारता आहात. तुम्हाला वाटतं तिच्यावर विश्वास ठेवावा पण परिस्थिती, वातावरण तसं नाहीये. दिवसभरात तुमचे वाद होतात. अबोला होतो. रुसवे- फुगवे होतात. अगदी कडकडून भांडणंही. पण तरीही तिला सांगा की एक दिवस तुला हे नक्की समजेल की मी तुझ्यासाठी जे सर्वोत्तम होतं तेच केलं आणि आई म्हणून तुम्ही तिचा त्यावेळी कान पकडला म्हणून मी चुकले नाही हे कळेल तिला आणि तेव्हा तुम्ही तिची चांगली मैत्रीण बनाल.

तुमच्या टीनेजर मुलीच्या डोक्यात या वयात हार्मोन्सच्या गोंधळाने मनाला जणू शॉक बसत असतात. शरीराच्या वाढीच्या प्रक्रियेने आणि बाहेरच्या अनेक गोष्टींमुळे. अभ्यासाच्या ताणामुळे, मीडियावरील बऱ्या वाईट पोस्ट आणि मेसेजमुळे, आव्हानात्मक पिअर प्रेशरमुळे, सोशल मीडियामुळे मेंदूत नुसता गोंधळ माजत असतो.

या वयात वागण्याची पद्धत आणि शिस्त यांचा तोल सांभाळणं तिच्यासाठी कठीण जातं. समजून वागणं आणि तुमची शिस्त पाळणं हे दोन्ही एकाच वेळी कसं करावं हे तिला कळत नाही. तुम्हाला दोघींनाही असं वाटत असतं की तुमच्यामध्ये छान नातं तयार व्हावं पण तुम्ही मोठ्या असल्याने पालकत्वाच्या सिंहासनावर बसलेले असता. मग पॉवर स्ट्रगल सुरू होतो. एटिट्यूड दाखवला जातो. मुलीच्या अनादाराच्या वागण्याने तुम्ही थकून जाता, तर दुसरीकडे मुलीचं मानसिक आरोग्य डळमळीत झालेलं असतं. काही मुली निराशा, चिंता, खाण्याच्या डिसऑर्डर यांच्यासारख्या गोष्टींशी झुंज देत असतात अशा परिस्थितीत टीनेजर मुलींशी वागावं तरी कसं ? ते पाहू या पुढच्या लेखात.

Comments
Add Comment