िवशेष : सीमा पवार
सोनेरी धरती जठे चांदी रो आसमान’, है रंग रंगीलो रस भरियो रे ‘म्हारो प्यारो राजस्थान’... पधारो म्हारे देश... कण कण सु गुँजे जय जय राजस्थान... बीएसएफ अधिकारी आपल्या राजस्थानचं अशा शब्दात कौतुक करतात. ते एेकताना त्यांच्याविषयीचा आदर अजून वाढतो. विविध राज्यातून आलेले जवान देशाच्या रक्षणासाठी इथल्या सीमेवर छाती ठोकून उभे आहेत. या प्रत्येक जवानाकडून केवळ माझा देश आणि त्याचं रक्षण करणं माझं कसं कर्तव्य आहे हेच ऐकायला मिळालं. कोट्यवधी भारतीयांच्या रक्षणासाठी सम वाळवंटाच्या सीमेवर भारतीय सुरक्षा दलाचे सैनिक तैनात आहेत. इथे पहाटेच्या पहिल्या प्रहरी चेक पोस्टवर तैनात असणारा जवान आम्ही त्या दिवशी प्रत्यक्षात पाहिलाय. इथली एकूण परिस्थिती, इथलं वातावरणं पाहिलं की डोळे पाणावतात आणि आपसुकच या जवानांसमोर आपण नतमस्तक होतो. भारतीय जवानांच्या अशा अनेक शौर्यगाथा दाखवणारे आणि प्रत्येक नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी याकरिता राजस्थानमधील सम वाळवंटात बीएसएफ पार्क उभारण्यात आले आहे. येथील पार्कमध्ये भारतीय सीमा सुरक्षा दल पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवर कसा पहारा देतात, त्यांना कोणत्या प्रकारे अडचणी येतात, येथील सुरक्षा भिंती कशा प्रकारे उभारण्यात आल्या आहेत. युद्धात कोणती शस्त्रे वापरली जातात याची सविस्तर माहिती दिली जाते.
राजस्थानातील ४६ अंश तापमान, वाळवंटातील धुळीपासून स्वत:चे संरक्षण करत देशाच्या रक्षणासाठी जवान सज्ज आहेत. बीएसएफ येथे नागपूरपासून अकोल्यापर्यंत विदर्भातील अनेक तरुणांचा समावेश आहे, जे मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी चोवीस तास तैनात आहेत. या तरुणांचे एकच स्वप्न होते देशाची सेवा. बटालियनच्या मुलीही खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. एकेकाळी जे अशक्य वाटत होते ते आता अभिमानाने सांगणारे जवान आहेत. आमच्या बटालियनच्या अनेक मुली मातृभूमीच्या रक्षणासाठी खांद्याला खांदा लावून उभ्या असल्याचे अधिकारी हसत सांगतात. जनतेसाठी, राजस्थानचे वाळवंट आता केवळ पर्यटन स्थळ राहिलेले नाही, तर देशभक्तीचे प्रतीक आहे. बीएसएफने येथे एक विशेष उद्यान विकसित केले आहे, जे सीमेचे वास्तववादी दृश्य आहे. युद्धात वापरलेली शस्त्रे, सीमास्तंभ आणि काटेरी तारांचे कुंपण येथे प्रदर्शित केले आहे. पर्यटक परत येतात तेव्हा ते केवळ छायाचित्रच घेत नाहीत, तर सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांबद्दल अभिमान आणि आदराची भावना देखील सोबत घेतात.
बीएसएफच्या कठोर निवड प्रक्रियेनंतर, ही संधी मिळणे हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे यश वाटते त्यांना. या दिवाळीत, आम्ही घरी जाऊ शकलो नाही; परंतु आम्हाला कोणताही पश्चात्ताप नाही. मुंबईतील प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने आयोजित केलेल्या मीडिया टूर दरम्यान, पत्रकारांचे एक पथक तनोटपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या सीमा चौकीवर पोहोचले आणि त्यांनी हे शूर सैनिक प्रत्येक क्षण देशासाठी कसे समर्पित करतात हे पाहिले. या छताखाली, त्यांचे चेहरे अभिमानाने आणि जबाबदारीने चमकत होते. ‘लोंगेवाला’ १९७१च्या भारत-पाक युद्धाचे साक्षीदार पाकिस्तानने १९७१च्या युद्धात एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत जैसलमेरमध्ये सुमारे २००० सैनिक आणि टँकसह घुसखोरी केली होती. अचानक हल्ला करून रामगढ आणि जैसलमेरवर ताबा मिळवण्याचा त्यांचा विचार होता. मात्र ४ डिसेंबरचा नाश्ता जैसलमेरमध्ये करण्याचा पाकिस्तानचा कुटील डाव भारतीय सुरक्षा सैन्याने हाणून पाडला. लोंगेवाला येथे याच ऐतिहासिक युद्धाच्या आठवणी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
या युद्धात वापरलेली शास्त्रात्रं, पाकिस्तानच्या उद्ध्वस्त झालेल्या रणगाड्यांचे अवशेष येथे पाहायला मिळतात. लोंगेवाला स्मारक दगडांनी केलेलं बांधकाम आहे. पण या दगडात त्या युद्धात शहिद झालेल्या भारतीय सैनिकाचे शौर्य, पराक्रम आणि मातृभूमीसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकाच्या वीरत्वाचे प्रतीक आहे.
४ डिसेंबर १९७१ पाकिस्तानने केलेला अचानक हल्ला. पाकिस्तानचे २००० तर १२० भारतीय सैनिक होते. मात्र अशा परिस्थितही पाकिस्तानी सैन्याला पळ काढण्यास भारतीय सैनिकांनी भाग पाडले, याचा साक्षीदार आहे लोंगेवाला पिलर क्रमांक ६३८. राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील लोंगेवाला या ठिकाणी असलेल्या युद्ध स्मारकात १९७१च्या युद्धाच्या या सर्व आठवणी जतन केल्या आहेत. भारत पाकिस्तान सीमा रेशेपासून अवघ्या १८ किमी अंतरावर असलेल्या या स्मारकाच्या प्रवेशद्वारावर उभा असलेला हा रणगाडा पाकिस्तानच्या पराभवाची साक्ष देत उभा आहे.
५ डिसेंबर १९७१ हा एक महत्त्वाचा दिवस समजला जातो. लोंगेवाल परिसरात असलेल्या चौकीवर लष्कराला तैनात करण्यात आले होते. भारतीय सैनिकांकडे दोन मीडियम मशीन गन, ८१ एमएमचे दोन मोर्टार, टँकपासून संरक्षणासाठी खांद्यावरून चालवले जाणारे चार रॉकेट लाँचर आणि एक रिकॉयलेस गन होती. त्यांच्याकडं काही भूसुरुंगही होते, पण तोपर्यंत ते शत्रूच्या मार्गावर पसरवण्यात आले नव्हते. या चौकीची जबाबदारी असलेले मेजर कुलदीप सिंह चाँदपुरी यांनी कॅप्टन धरमवीर भान यांच्या नेतृत्वात काही सैनिकांना पुढं गस्त घालण्यासाठी पाठवलं होतं. दरम्यान, पाकिस्तानी टँक भारतीय हद्दीत घुसले होते. ते लोंगेवालाकडे सरकले होते. मेजर चाँदपुरी यांनी बटालियन मुख्यालयाला फोन केला आणि शस्त्रांसह आणखी कुमक मागवली.पाकिस्तानच्या रणगाड्यांनी दुपारी मारा सुरू केला. मेजर जनरल आरएफ खंबाटा यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा परिस्थिती गंभीर असल्याचं आणि त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेशी कुमक नसल्याचा अंदाज त्यांना आला. त्यांना हवाई दलाच्या मदतीची आशा होती. विंग कमांडर एमएस बावा यांच्याशी संपर्क केला. बेस कमांडर मेजर जनरल खंबाटा यांच्याशी बोलले. सकाळी सूर्योदय होताच हंटर विमानं उड्डाण घेतील असं आश्वासन त्यांनी दिलं. सकाळी ४ वाजता बावा यांनी स्क्वाड्रन लीडर आरएन बाली यांना ब्रीफ केलं. दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, एवढ्या मोठ्या मोहिमेसाठी पाकिस्तानकडे कोणत्याही प्रकारची हवाई मदत नव्हती. त्यामुळं भारतीय विमानांनी त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा ते एकापाठोपाठ नष्ट झाले. या युद्धात पाकिस्तानच्या ४५ पैकी ३६ रणगाडे उदध्वस्त झाले. हे युद्ध फक्त पाकिस्तानचे रणगाडे नष्ट केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्मरणात राहील असं नाही, तर पाकिस्तानी लष्कराचं मनोधैर्यही त्यामुळं खूप खचलं होतं. या युद्धात शौर्य गाजवणारे भारतीय कंपनी कमांडर कुलदीप सिंह चाँदपुरी यांचा महावीर चक्र देवू्न गौरव करण्यात आला होता, तर पाकिस्तानचे डिव्हीजनल कमांडर मेजर जनरल बीएम मुस्तफा यांना तपासानंतर पदावरून हटवण्यात आलं होतं.






