नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे अनेक भागातील रस्ते तुटले असून संपर्क व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सागर बंधू’अंतर्गत श्रीलंकेसाठी मदतकार्य आणखी वेगाने सुरू करण्यात आले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
भारतीय वायुसेनेची तीन विमानं बेली ब्रिजचे साहित्य, एक JCB आणि इंजिनियर कोअरचे १३ जवान घेऊन कोलंबोमध्ये उतरली. या सामानाचे वजन सुमारे ५५ टन असून, बाधित भागांमध्ये रस्ते दुरुस्त करण्यासाठी हे साहित्य पाठवण्यात आले आहे. याआधी शुक्रवारी सी -१७ विमानाद्वारे इंजिनियर आणि वैद्यकीय तज्ज्ञांसह २५ जणांची तुकडी कोलंबोमध्ये पोहोचली. भारताने ३ डिसेंबरला फील्ड हॉस्पिटलचीही सोय केली. पहिल्या २४ तासांत या रुग्णालयात सुमारे ४०० रुग्णांवर उपचार करण्यात आले. फील्ड हॉस्पिटलमध्ये ५५ लहान शस्त्रक्रिया आणि एक मोठी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. भारतीय वैद्यकीय पथकाने गरजूंना तातडीने उपचार मिळावेत यासाठी काम सुरू केले आहे.
भारताने २८ नोव्हेंबरला ‘ऑपरेशन सागर बंधू’ सुरू केले. चक्रीवादळ दितवाहमुळे श्रीलंकेत निर्माण झालेल्या महापुरात मोठे नुकसान आणि जीवितहानी झाली होती. या ऑपरेशनअंतर्गत INS विक्रांत आणि INS उदयगिरी यांनी तातडीची मदत सामग्री श्रीलंकेत पोहोचवली. दोन्ही युद्धनौकांच्या हेलिकॉप्टरांनी आपत्तीग्रस्त भागांचे हवाई सर्वेक्षण करून शोध आणि बचाव कार्याला गती दिली आहे.






