मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. येस बँक घोटाळा त्यांना भोवला आहे. रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शिअल फायनान्स या रिलायन्स अनिल अंबानी समुहाशी संबंधित १८ मालमत्तांची जप्ती झाली आहे. ईडीने अर्थात सक्तवसुली संचालनालयाने ही कारवाई केली आहे. रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शिअल फायनान्स या संस्थांशी संबंधित मुदत ठेवी, बँकेतील पैसे आणि विविध कंपन्यांतील समभाग अशी एकूण ११२० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने R Com, अनिल अंबानी आणि इतरांवर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ईडी पण याप्रकरणी चौकशी करत आहे. या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.च्या अंधेरीतील व्यावसायिक इमारतींसह बॅलार्ड इस्टेट येथील रिलायन्स सेंटर, सांताक्रूझ येथील आलिशान सदनिका, अतिथीगृह अशा सात, रिलायन्स पॉवर लि. च्या दोन, रिलायन्स व्हॅल्यू सर्व्हिस प्रा. लि.चे चेन्नई येथील २३१ भूखंड तसेच सात सदनिका अशा नऊ मालमत्तांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
याअगोदर ८ हजार ९९७ रुपयांची मालमत्ता जप्त
ईडीने आधीच रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स कमर्शिअल फायनान्स, रिलायन्स होम फायनान्स या कंपन्यांतील घोटाळ्याप्रकरणी आधीच एक जप्तीची कारवाई केली आहे. त्या कारवाईत अनिल अंबानींच्या समुहाची आठ हजार ९९७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण दहा हजार ११७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
कायदेशीर कारवाई सुरू झाल्यामुळे शेअर बाजारात अनिल अंबानी समुहाच्या शेअरची घसरण सुरू झाली आहे. अनिल अंबानी समुहावरील कर्ज कमी झाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असतानाच नवी जप्तीची कारवाई झाली आहे. यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत.