पुणे : इंडिगो एअरलाईन्सने घातलेल्या गोंधळामुळे प्रवाशांना तब्बल सहा दिवसांपासून तिष्ठत ठेवले आहे. विमानतळावर सकाळपासून प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. केंद्रीय नागरी विमान उड्डाण मुरलीधर मोहोळ यांनीही ''चुकीला माफी नाही, कठोर कारवाई होणारच'', असा इशारा दिला आहे. इंडिगोच्या ढिसाळ व्यवस्थेमुळे प्रवाशांचे हाल झाले. पायलट संघटनेने आधीच मागणी केली होती की ड्युटीचे तास कमी करावेत. डीजीसीएनेही त्यावर आदेश दिले. इतर विमान कंपन्यांनी ते ताबडतोब लागूही केले. दोन टप्प्यांत बदल करायचे ठरले होते. पण इंडिगो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत झोपेतच होती, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले. या गोंधळाला इंडिगो एकटं जबाबदार,” असे त्यांनी ठामपणे म्हटले. कामाचे तास अचानक १० वरून ८ झाले. या दोन तासांच्या फरकामुळे पायलट आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता निर्माण झाली. १ नोव्हेंबरपासूनच इंडिगोवर हा ताण वाढत गेला आणि शेवटी त्यांची संपूर्ण यंत्रणाच कोसळली. नागरी उड्डाण मंत्रालयाने याची दखल घेतली असून, तात्पुरते नियम लागू करून फेब्रुवारीपर्यंत यंत्रणेला स्थगिती देण्यात आली आहे. डीजीसीएने या प्रकरणात ४ सदस्यांची चौकशी समिती नेमली आहे. प्रवाशांसाठी कंट्रोल रूमही स्थापन केली आहे. इंडिगोला नोटीस बजावली असून- ”कुठलीही चूक माफ केली जाणार नाही. जे आवश्यक असेल ते करू,” असा इशारा मोहोळ यांनी दिला. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.






