विशेष : डॉ. विजया वाड
“लक्ष्मण ए लक्ष्मण” पार्वतीने हाक मारली.
“काय गं पारू?”
“अरे किती वेळ ड्यूटी करणार तू?”
पारू त्याची पत्नी होती. लक्ष्मणवर तिचा फार जीव होता. आपला बालमित्र आपला पती झाला यासाठी देवाचे किती वेळा तिने आभार मानले असतील याला मोजमाप नव्हतं. पोलीस लायनीत जन्म गेला. दोघांचे बाप पोलीसच होते. दोघांची निवृत्ती ही पोलीस हवालदार म्हणूनच झाली. ठाण्याचा चेकनाका ही दोघांची ड्यूटी मिरवीत होती. हपिसर लोक या दोघांच्या जीवावर निर्धास्त असत. जेलर साहेब या दोघांचे मित्र होते. कडक सॅल्यूट डोकत ठाणा जेलचे जेलर साहेब खूश होत.
“लक्षू, खूप झालं. एक आख्खा दिवस उलटला.”
“अगं, पारू, दुसरा बदली येईपर्यंत मला ड्यूटी करावी लागणार.”
“आता मी करते तुझी चाकरी. अगदी तुझ्यापरीस भारी करते बघ.” ती त्याचे हात खेचत म्हणाली.
“उगा हट्ट करू नकोस गं पारू”
“कोण? ती शेवंता?”
“हां ! तीच ती! पटकनी तिचा ड्रेस मिळवते मी. शेवंता नाही म्हणायची नाय. पटकनी तयार होते नि झटकनी तुझी डिवटी करते.”
“ऐक पारू ! माझे साहेब रागावतील. मला ड्यूटीवर नाही, असं बघून, तांबडे-लाल होतील.”
“होऊ देत तांबडे-लाल.”
“कदाचित मला कामावरून काढून टाकतील. काही सांगवा येत नाही.” तो आता थरथरू लागला होता.
“लक्ष्मण” चिरपरिचित आवाज कानावर आला. साहेब होते.
“सलाम साहेब.”
“किती वेळ ड्यूटी करतो आहेस?”
“१८ तास झाले साहेब.”
“ऊठ आता. घरी जा !”
“पण चेकनाका कोण सांभाळेल?”
“तुझी बायको सांभाळेल.”
“काSSय?”
“अरे बायको म्हणजे काय? अर्धांगिनीच ना!”
“अहो पण साहेब...”
“आता पण नाही बिन नाही.”
“तिच्या अंगावर ड्रेस नाही.”
“मी घेऊन आलोय फीमेल पोलीसचा ड्रेस.”
“काय सांगता काय साहेब?”
लक्ष्मण आश्चर्यात बुडाला. साहेबाचे हे रूप नवेच होते लक्ष्मणसाठी
“पार्वतीबाई, समोरच्या कंट्रोलरीमध्ये जा नि हा युनिफॉर्म चढवा अंगावर.”
“चढवते साहेब.” पार्वतीने तो युनिफॉर्म घेतला नि ती कंट्रोलरूमकडे चालती झाली.
“साहेब, तुमचे फार उपकार झाले.” लक्ष्मणच्या आवाजात हरिवर होता. काठोकाठ !
अरे, तुला ऑप्शन शोधून जमलो नि दमलो बघ.”
“का? काय झाल?”
“एकही शिपाई कामावर यायला तयार नाही.”
“म्हणजे?”
“एकाला संडासला होतेय एकसारखी, दुसरा परगावी गेलाय. तिसऱ्यास ताप आहे. मग म्हटलं आपणच ड्यूटी करावी ! मग तेवढ्यात हा उपाय सुचला, नि पोलीस लायनीत गेलो, नि हा ड्रेस घेऊन आलो.”
तेवढ्यात पार्वती आली. “मी तयार झाले साहेब. “आता उतर रे भर्तारा! मला करू दे डिवटी. पोलिसाची बायको आहे मी. हार मानायची नाही. पण एक विचारू का साहेब? मी नसते तर? काय केलं असतं हो साहेब? सांगा ना!” “मी केली असती त्याची ड्यूटी !” साहेब पटकन् म्हणाले. त्यांची माणुसकी तिच्या डोळ्यांत मावत नव्हती.