दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने इंडस्ट्रीमध्ये चालत असलेल्या ‘पेड मार्केटिंग’च्या संस्कृतीवर कडाडून टीका केली आहे. या संदर्भात तिनं थेट सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. आजकाल चित्रपट चांगला दिसावा म्हणून पैसे देऊन फेक पब्लिसिटी करण्याचा ट्रेंड वाढत चालला असल्याचं तिनं या पोस्टमधून म्हटलं आहे. यामी म्हणते, “अनेक दिवसांपासून मला एक गोष्ट सांगायची होती आणि आज मला वाटतं की ती बोलायलाच हवी. चित्रपटाच्या मार्केटिंगच्या नावाखाली पैसे देऊन ‘हाइप’ निर्माण करण्याचा जो ट्रेंड सुरू झाला आहे, तो खूपच चुकीचा आहे. नाहीतर ‘ते’ सतत नकारात्मक गोष्टी लिहीत राहतात. तेही चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच… आणि जोपर्यंत तुम्ही ‘त्यांना’ पैसे देत नाही, तोपर्यंत तो दबाव तसाच सुरू राहतो, ही सरळसरळ वसुलीच आहे.” पुढे ती म्हणते, “हा ट्रेंड म्हणजे एक राक्षस आहे, जो शेवटी सगळ्यांनाच खाणार आहे. गेल्या पाच वर्षांत ‘सक्सेस’च्या नावाखाली किती गोष्टी लपवल्या गेल्या आहेत, जर त्या उघड झाल्या तर अनेकांसाठी ते अवघड होईल. साऊथमध्ये अशा गोष्टी करण्याची कोणाची हिंमत होत नाही, तिथली इंडस्ट्री अनेक विषयांवर एकत्रपणे उभी राहते. म्हणूनच मी कलाकारांना आवाहन करते की हे थांबवा.






