Saturday, December 6, 2025

चैत्यभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दादरमधील वाहतुकीत बदल

चैत्यभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दादरमधील वाहतुकीत बदल

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी दादरमधील विविध मार्ग बंद केले आहेत. त्या आनुषंगाने ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत दादरमधील वीर सावरकर मार्ग, रानडे रोड, एस. के. बोल रोड, ज्ञानेश्वर मंदिर यासह विविध मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच, वाहनचालक, प्रवाशांची कोंडी होऊ नये, यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिकेने गर्दी नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. चैत्यभूमी व आसपासच्या परिसरातील रस्त्यांवरील वाहतुकीत ७ डिसेंबरपर्यंत बदल करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत स्वातंत्रवीर सावरकर मार्ग सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदूजा हॉस्पिटलपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. त्याशिवाय रानडे रोड, ज्ञानेश्वर मंदिर, जांभेकर महाराज रोड, केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, एम. बी. राऊत मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वांद्रे -वरळी सागरी उड्डाणपुल मार्गे (सी लिंक) दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

या रस्त्यांवर ‘नो पार्किंग झोन’

स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज रोड, रानडे रोड, केळूस्कर रोड दक्षिण आणि उत्तर, एम. बी. राऊत रोड, पांडुरंग नाईक मार्ग, एन. सी. केळकर रोड, डॉ. वसंतराव जे. राथ मार्ग हा स्वातंत्रवीर सावरकर मार्ग ते अमेगो हॉटेलपर्यंत, एस. एच. पळरकर मार्ग हा स्वातंत्रवीर सावरकर मार्ग ते मिलरनीयम बिल्डींगपर्यंत, डी. एस. बाबरेकर मार्ग हा सूर्यवंशी हॉल जंक्शन ते व्हिजन क्रेस्ट बिल्डींगपर्यंत, किर्ती कॉलेज लेन मार्ग किर्ती कॉलेज सिग्नल ते मीरामार सोसायटीपर्यंत, काशीनाथ धुरु रोड काशीनाथ धुरू जंक्शन ते आगार बाजार सर्कलपर्यंत, एल. जे. रोड शोभा हॉटेल ते गडकरी जंक्शनपर्यंत, कटारिया मार्ग गंगाविहार जंक्शन, शोभा हॉटेल ते आसावरी जंक्शनपर्यंत, राजगृह परिसराच्या बाजूचा हिंदु कॉलनी रोड क्र. १ ते रोड क्र. ५ पर्यंत, लखमशी नप्पु रोड शुभम हॉटेल ते रुईया कॉलेज, दडकर मैदानापर्यंत.

Comments
Add Comment