नाल्याच्या रुंदीकरण कामासाठी विकासकाची केली नियुक्ती
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील प्रभादेवी येथील साई सुंदरनगर, कामगारनगर -२ व इतर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहिनीचे रुंदीकरण करून त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. या नाल्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत असून महापालिकेने यासाठी विकासक असलेल्या स्कायलार्क बिल्डकाॅन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली आहे. या नाल्याचे रुंदीकरण करण्यासाठी तब्बल सुमारे ५० काेटी रुपये खर्च केले जाणार आहे.
साई सुंदरनगर सहकारी गृहनिर्माण संस्था या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेस प्रथमतः १९९८ साली झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामार्फत मंजूरी देण्यात आली होती. अंतिम भूभाग क्र १०७८ मधील एकूण १७२७४.२२ चौ.मी.एवढृया क्षेत्रावरील भूभागावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजूर केली. ड्रेनेज आणि रस्त्याच्या संपूर्ण कामाचा खर्च ७५ टक्के महापालिका आणि २५ टक्के सोसायटी तथा विकासक या प्रमाणात वाटून घेतला जाईल आणि २५ टक्के महानगरपालिकेने ठरवल्याप्रमाणे महानगरपालिकेला आगाऊ ठेव म्हणून द्यावी असे निश्चित करण्यात आले हाेते. सन १९९८ साली मुळ मंजूर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये लगतच्या वेगवेगळ्या अनुक्रमे ९ गृहनिर्माण संस्था कालांतराने समाविष्ट करून मुळ झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे क्षेत्र वेळोवेळी वाढविण्यात आले आहे. अलीकडेच कामगार नगर-२ व माहिम नगर विकास योजना क्र.४ मधील अंतिम भूभाग क्र. १०७८ वरील शिव सम्राट गृहनिर्माण संस्था या योजनेमध्ये समाविष्ठ करण्यात आली आहे.
रस्त्याचा निधी कमी पडल्याने तब्बल २५० कोटी रुपये करावे लागले वळते मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या रस्ते ...
नव्याने समाविष्ट कामगार नगर-२ मधील एसअाए प्रकल्पामध्ये सुमारे २००० झोपड्या बाधित असून त्यांना नवीन इमारतीमध्ये त्यांना सामावून घ्यायचे आहे. या झोपडी धारकांनी अस्तित्वात असलेल्या नाल्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नाल्याची देखभाल आणि नाल्यातील गाळ काढणे शक्य होत नाही. तसेच नाला धोकादायक स्थितीत असल्याने त्याची दुरुस्ती व पुर्नबांधणी करणे आवश्यक आहे. हा नाला हिंदमाता मार्केट व दादर पुर्वेकडील पावसाळी पाण्याचा विसर्ग होण्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे या नाल्यावरील अतिक्रमण हटवून त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने संबंधित विकासकाचीच निवड करून त्यांच्या मार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. या नाल्याच्या रुंदीकरणासाठी सुमारे ४९.३५ काेटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.





