Saturday, December 6, 2025

'कैरी' सिनेमातून सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची निखळ मैत्री १२ डिसेंबरला येणार स्क्रीनवर

'कैरी' सिनेमातून सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची निखळ मैत्री १२ डिसेंबरला येणार स्क्रीनवर

सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची ‘कैरी’मधील मनाला भिडणारी दोस्ती, दोघांचा इमोशनल बॉण्ड ठरणार लक्षवेधी

मैत्री करणं आणि ती निभावणं हे फार कमी लोकांच्या आयुष्यात असतं. पण असे बरेच मित्र असतात जे त्यांच्या मैत्रीला जगतात आणि मदतीला हात पुढे करतात. बरेचदा हीच मैत्री आपल्या मित्र-मैत्रिणीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते. अशीच मैत्री आता सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीव यांच्या आगामी 'कैरी' चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ नेहमीच त्याच्या कलाकार मित्रांबरोबर धमाल करताना दिसतो. आता सिद्धार्थचा हाच मैत्री जपणारा स्वभाव 'कैरी' चित्रपटातून मोठ्या स्क्रीनवरही पाहायला मिळणार आहे.

सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीव यांच्यातील स्पेशल बॉण्डिंगची झलक 'कैरी' सिनेमाच्या ट्रेलर, गाण्यातून पाहायला मिळालीच आहे. आपल्या विनोदी स्वभावाने नेहमीच साऱ्यांना खळखळवून हसवणारा सिद्धार्थ या चित्रपटात सायलीला आनंद देताना दिसतोय. इतकंच नाहीतर दोघांचा इमोशनल बॉण्डही पाहायला मिळाला. मित्र म्हणून तो सायलीच्या पाठीशी तिच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभा असलेला दिसला. या ट्रेलरनंतर सिद्धार्थ खऱ्या आयुष्यात जसा आहे तसाच सिनेमात वावरताना दिसत असल्याची चर्चा रंगली आहे.

चित्रपटात आता सायली-सिद्धार्थची मैत्री कशी रंगत आणणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. कैरी सिनेमात सायली-शशांकची लव्हेबल केमिस्ट्री जितकी भावतेय त्याहून दुप्पट सायली-सिद्धार्थची मैत्री पसंतीस पडत आहे. सिद्धार्थसह काम करण्याबाबत बोलताना सायली म्हणाली, "मला एकूणच या चित्रपटात काम करताना धमाल आली. पण सिद्धार्थने ही धमाल अधिक रंगतदार केली. सिद्धार्थ खूप जॉली आहे हे सर्वांनाच माहित आहे, आणि सिनेमातही तो अगदी शेवटपर्यंत तसाच होता. आम्ही दोघांनी खरंच खूप एन्जॉय केलं".

Comments
Add Comment