Friday, December 5, 2025

पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्ग प्रवेश नियंत्रण प्रकल्पाचा पैसा वळवला रस्ते सिमेंट काँक्रिट कामांसाठी

पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्ग प्रवेश नियंत्रण प्रकल्पाचा पैसा वळवला रस्ते सिमेंट काँक्रिट कामांसाठी

रस्त्याचा निधी कमी पडल्याने तब्बल २५० कोटी रुपये करावे लागले वळते

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या रस्ते कामांसाठी तरतूद केलेला निधी आता कमी पडू लागला असून या रस्ते कामांचे बिले देण्यासाठी पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या प्रवेश नियंत्रण प्रकल्पासाठी तरतूद केलेला निधी वळता करण्याची वेळ आली आहे. रस्ते कामांची बिले देण्यासाठी तब्बल २५० काेटी रुपये अन्य वळते करण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेच्यावतीने टप्पा एक आणि टप्पा दाेन अंतर्गत तब्बल ८०० किलाेमीटर लांबीची कामे हाती घेतली आहे. यातील अर्धवट कामे ही ०१ ऑक्टाेबर २०२५नंतर टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात आली आहे़ ही अर्धवट कामे पूर्णत्वास येणार असल्याने तसेच चालू आर्थिक वर्षांत पूर्ण होणार आहे. यासाठी मार्च २०२६ पर्यंत पुरेसा निधी नसल्याने महापालिकेने रस्ते कामांसाठी तरतूद केलेला निधी संपत आल्याने अन्य कामांसाठी केले निधी वळता करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहर भागातील कामांसाठी मुख्य रस्ते आणि संगमस्थानाच्या विकासासाठी एका सांकेतांकमध्ये ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती, त्यातील सुमारे ३२६ कोटी रुपये आणि दुसऱ्या सांकेतांकमध्ये ३३३.६० कोटी रुपयांची तरतूद केली होती, त्यातून १९१.१३ कोटी रुपयांचा निधी वापरला गेला आहे. परंतु रस्ते कामे पूर्ण होणार असल्याने भविष्यात रस्ते कामांची बिले देण्यासाठी दुसऱ्या खात्यातून पैसे वळवण्यात येत आहे. पूर्व आणि पश्चिम महामार्गावरील प्रवेश नियंत्रण प्रकल्पासाठी ४४२ कोटी रुपयांची ठोक तरतूद केली होती. परंतु आजमितीस ४३९.०७ कोटी एवढा निधी उपलब्ध आहे. त्यामुळे या उपलब्ध निधीतून ५० कोटी रुपये आणि २०० कोटी रुपये अशाप्रकारे एकूण २५० कोटी रुपये वळते करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पूर्व आणि पश्चिम महामार्गावरील प्रवेश नियंत्रण प्रकल्पाचे काम चालू आर्थिक वर्षात होणार नसल्याने तसेच त्यासाठीचा निधी वाया जाणार असल्याने हा पैसा रस्ते सिमेंट काँक्रिट कामांसाठी वळता करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा