विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका २-१ अशी जिंकणार आहे. याआधी कोलकाता आणि गुवाहाटी येथे जिंकत दक्षिण आफ्रिकेने भारताविरूद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. यानंतर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रांचीमध्ये भारताचा आणि रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. यामुळे आता विशाखापट्टणम जिंकून भारत कसोटी मालिकेतल्या पराभवाचा वचपा काढतो की नाही याकडे अनेक क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.
विशाखापट्टणमच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला. दक्षिण आफ्रिकेने ४७.५ षटकांत सर्वबाद २७० धावा केल्या. भारताला जिंकण्यासाठी ५० षटकांत २७१ धावा करायच्या आहेत. भारताकडून कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या तर अर्शदीप आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने १०६, रायन रिकेलटनने शून्य, टेम्बा बावुमाने ४८, मॅथ्यू ब्रीट्झकेने २४, एडेन मर्करामने एक, डेवॉल्ड ब्रेव्हिसने २९, मार्को जॅनसेनने १७, कॉर्बिन बॉशने नऊ, केशव महाराजने नाबाद २०, लुंगी न्गिडीने एक, ओटनील बार्टमनने तीन धावांचे योगदान दिले.
कुलदीपने डेवॉल्ड ब्रेव्हिस, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, लुंगी न्गिडी या चौघांना तर प्रसिद्ध कृष्णाने क्विंटन डी कॉक, मॅथ्यू ब्रीट्झके, एडेन मर्कराम, ओटनील बार्टमन यांना बाद केले. अर्शदीपने रायन रिकेलटनला तर रवींद्र जडेजाने टेम्बा बावुमाला बाद केले.






