Saturday, December 6, 2025

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास संकट निर्माण झाले आहे. शेकडो उड्डाणं रद्द झाल्याने हजारो प्रवासी अडचणीत सापडले आहेत. देशाच्या हवाई सेवांमध्ये इंडिगोचा सुमारे ६५ टक्के हिस्सा असल्याने या विस्कळीतपणाचा सर्वाधिक फटका सामान्य प्रवाशांना बसला आहे.

उड्डाणं रद्द झाल्यानंतर अनेक प्रवासी इतर कंपन्यांकडे वळू लागले. याच पार्श्वभूमीवर काही एअरलाईन्सनी तिकीट दर वाढवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप आणखी वाढला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून नागरी उड्डाण मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मंत्रालयाने हवाई वाहतूक विस्कळीत झालेल्या सर्व मार्गांवर ‘फेअर कॅप’ लागू केला आहे. या निर्णयामुळे कोणत्याही एअरलाईनला ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त तिकीट दर आकारता येणार नाहीत. प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्यात आली असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इंडिगोच्या नव्या ऑपरेशनल नियमांची पुरेशी तयारी न झाल्याने गेल्या दोन-तीन दिवसांत अनेक उड्डाणं रद्द झाली, तर बरीच उड्डाणं विलंबाने निघाली. या स्थितीत इतर कंपन्यांकडे प्रवासी वाढले आणि काही मार्गांवरील तिकिटांचे दर अचानक वाढले. याची गंभीर दखल घेत मंत्रालयाने नियामक अधिकारांचा वापर करत कमाल तिकीट मर्यादा निश्चित केली आहे.

मंत्रालयाने सर्व कंपन्यांना अधिकृत आदेश पाठवले असून, परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत हा फेअर कॅप लागू राहणार आहे. कोणत्याही एअरलाईनला या नियमाविरुद्ध तिकीट विक्री करण्यास परवानगी नसेल, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment