Sunday, January 25, 2026

महामानवाला वंदन

महामानवाला वंदन

जय भीम' अशी कोणी साद घातली, तर तो 'आंबेडकरवादी' असा पूर्वी समाजाचा दृष्टिकोन होता. दलित, वंचिताच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग हा आज एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित नाही, तर समतावादी विचार करणारा प्रत्येक भारतीयांचे डॉ. आंबेडकर हे प्रेरणास्थान आहेत. अभिनेत्री चिन्मयी सुमित हिने अलीकडेच एका कार्यक्रमात 'मी जय भिमवाली' आहे असे म्हटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. संविधानाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांनी स्त्रियांसाठी केलेले विशेष कायदे आणि दिलेल्या सवलतींमुळे प्रत्येक भारतीय स्त्रियांनी स्वत:ला 'जय भिमवाली' म्हणायला हवे, असे चिन्मयी म्हणाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमी परिसरात त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते, त्यात सर्वच जाती-धर्मांच्या व्यक्तींचा सहभाग पाहायला िमळतो. बाबासाहेबांचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व नव्या पिढीला भुरळ घालते. समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांचे कार्य अद्वितीय असे होतेच; पण त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत दिलेल्या प्रचंड योगदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आधुनिक भारताला त्यांची सर्वात मोठी देणगी म्हणजे ’भारतीय राज्यघटना.’ जगातील श्रेष्ठ घटनांमध्ये आपल्या देशाच्या घटनेचा समावेश होतो. समता, बंधुभाव आणि न्याय ही तत्त्वे आपल्या घटनेचा भक्कम पाया आहेत. भारतीय संविधानामुळे देशाला लोकशाही व्यवस्था मिळाली. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना विकास आणि प्रगती साध्य करण्यासाठी समान संधी राज्यघटनेमुळेच मिळाली. आपल्या देशाचे अखंडत्व आणि एकता टिकून ठेवण्याच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेचे फार मोठे योगदान आहे, ही गोष्ट कोणालाही नाकारता येणार नाही.

डॉ. आंबेडकर हे एक श्रेष्ठ संविधानतज्ज्ञ होते. त्यांनी ६० पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला होता. जगातील कोणत्याही राज्यघटनेत तरतूद नसलेली कलमे, म्हणजे मूलभूत हक्काची कलम १४ ते ३२ आपल्या संविधानात समाविष्ट करण्यात आली. 'कलम ३२’ तर डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे हृदय म्हटलेे आहे. कारण, या कलमाद्वारे आपल्या हक्कांवर कोणीही गदा आणत असेल, तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क दिला आहे. मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची, पंथाची, जातीची असो, त्यांना समान हक्काचे जीवन बहाल केले आहे. स्त्री-पुरुषांना समान अधिकार मिळवून दिला आहे. म्हणूनच आज मुख्यमंत्री, राज्यपाल, न्यायाधीश, लोकसभाध्यक्ष, पंतप्रधान, राष्ट्रपती आदी उच्चपदावर महिलांना मान मिळतो आहे. हे केवळ संविधानामुळेच शक्य झाले आहे. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे, असे नमूद करून डॉ. आंबेडकरांनी कायद्यापुढे सर्व नागरिक समान आहेत, असे स्पष्ट केले होते. भारतीय राज्यघटनेचेे उगमस्थान भारतीय जनताच आहे, असा उल्लेख राज्य घटना सोपविताना त्यांनी केला होता. 'एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य’ हे तत्त्वच मुळात आपल्या राजघटनेने स्वीकारलेले आहे. त्याच वेळेस काही इशारेदेखील दिले आहेत. डॉ. आंबेडकरांनी असे म्हटले होते की, 'घटना कितीही चांगली असली तरी राबवणारे लोक जर वाईट असतील, तर त्या घटनेचा उपयोग होणार नाही.' त्यामुळे भारतीय संविधानाची अंमलबजावणी जोपर्यंत प्रामाणिकपणे होणार नाही, तोपर्यंत आपण महासत्ता म्हणून जगाला मान्य होणार नाही. सामान्य माणसाच्या हाती ती सत्ता जाणार नाही. श्रीमंत व्यक्ती अधिक श्रीमंत होत राहील व कालांतराने सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिकदृष्ट्या पराकोटीची विषमता माजेल. संविधानाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होणे म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहे, हे द्रष्ट्या डॉ. बाबासाहेबांनी तेव्हाच ओळखले होते. डॉ. आंबेडकरांचा हा दृष्टिकोन लक्षात घेऊनच दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांनी आणि नेपाळने आपली राज्यघटना लिहिताना डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा सखोल अभ्यास केला होता. भारतीय राज्यघटनेत प्राचीन भारतीय परंपरा आणि सर्वंकष परिवर्तन यांचा समतोल साधण्याचे फार अवघड काम बाबासाहेबांनी केले होते. खरंतर हे भीमधनुष्य पेलणे सोपे नव्हते. संविधानाच्या रूपाने एक राजकीय-सामाजिक क्रांतिकारी विधानच त्यांनी अस्तित्वात आणले. त्यातून भारताच्या आधुनिकीकरणाला जोरदार चालना मिळाली, हे सत्य कोणीही नाकारत नाही.

भारतीय राज्यघटना ही भारतीय समाजाच्या आधुनिकीकरणाची शक्तिशाली प्रेरणा ठरावी हा प्रमुख राजकीय उद्देश डोळ्यांपुढे ठेऊन त्यांनी संविधानाची सगळी उभारणी केली. लोकशाही जीवनपद्धती आणि सामाजिक क्रांती यांच्यात एकसंधता आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्याचाच भाग म्हणून, लोकशाही, प्रातिनिधिक सरकार, व्यक्तिस्वातंत्र्य, कायद्यापुढे सर्वांची समानता या गोष्टी फार क्रांतिकारी ठरल्या. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या वैश्विक मूल्यांवर आधारित नवभारताची जडणघडण करण्याची कामगिरी त्यातूनच साकारली गेली. राष्ट्रीय एेक्य आणि एकात्मता अबाधित राखण्याचे आव्हान संविधानाने पेलले आहे. डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारताच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक आहेत. देशाची प्रगती मोजण्याची फूटपट्टी काय असावी, याबाबत मत मांडताना बाबासाहेब नेहमी सांगायचे, ज्या देशात स्त्रियांची प्रगती झाली असेल, तोच देश प्रगत मानला पाहिजे. राजकारणात व पक्षसंघटनेत स्त्रियांना अग्रक्रम दिला पाहिजे याबाबत ते नेहमी आग्रही होते. आज डॉ. बाबासाहेब हे सामाजिक न्याय, ज्ञाननिर्मिती आणि लोकशाही विचारधारेचे प्रतीक बनले आहेत. डॉ. आंबेडकर हे कायदेतज्ज्ञ होते, राजकीय विचारवंत होते, जागतिक राजकीय विचारांचा आणि राजकारणाचा त्यांचा गाढा व्यासंग होता. भारतात जे लोकोत्तर पुरुष जन्मले, त्यापैकीच बाबासाहेब एक हाेते. सगळं जग आज ज्यांच्या विद्वत्तेने स्तिमित होते, जसा द्रष्टा देशाला घटनाकार म्हणून लाभला हे या देशाचे खरोखरच अहोभाग्य आहे.

Comments
Add Comment