रवींद्र तांबे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६९ वा महापरिनिर्वाण दिन. १४ एप्रिल १८९१ रोजी जन्मलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झाले. ७ डिसेंबर १९५६ रोजी संध्याकाळी ७.५० वाजता दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आताची चैत्यभूमी) त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी पंधरा लाखांपेक्षा जास्त आंबेडकरी अनुयायी देशभरांतून अंत्ययात्रेत सामील झाले होते. दरवर्षी २५ लाखांपेक्षा जास्त आंबेडकरी अनुयायी स्वखर्चाने देश-विदेशातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे चैत्यभूमी ही आंबेडकरी जनतेचे प्रेरणास्थान झाले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय तत्त्वज्ञान म्हणजे आंबेडकरवाद म्हणून ओळखले जाते. जे देशातील समानता, लोकशाही आणि सामाजिक न्यायावर आधारित आहे. त्यांचे तत्त्वज्ञान हे समाज परिवर्तन करणारे आहे. यामध्ये देशातील जातीयता नष्ट करणे आणि त्यांचे मूलभूत अधिकार प्राप्त करून देणे होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समता, स्वातंत्र्य, बंधुत्त्व आणि न्याय या मूल्यांवर आधारित आहेत. मात्र अजूनही आपल्याला घटनेची मुल्ये समजली नाहीत. त्यामुळे भारतीय राज्य घटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने देशातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची वेळ आली. त्यामुळे आपल्या देशात अजूनही दलित शोषित समाजाला न्यायापासून वंचित राहावे लागत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा पाया समता व न्यायावर आधारित आहे. तेव्हा राजकीय स्वातंत्र्यासाठी सामाजिक समानता असणे गरजेचे आहे. त्यांनी देशातील जातीयता व आर्थिक विषमतेविरुद्ध लढा देऊन त्यांच्या हक्कांची जाणीव करून त्यांना त्यांचे हक्क घटनेच्या माध्यमातून मिळवून दिले. मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली असती तर महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी राजकीय तत्त्वज्ञानाचा आढावा घेण्याची वेळ आली नसती. आपल्या देशात लोकशाही आहे. सामाजिक लोकशाहीपासून लोकशाहीला सुरुवात होते. समाजात समानता नसेल तर लोकशाही नांदणार कशी? कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे कट्टर समर्थक होते. भारतीय राज्यघटनेचा विचार केल्यास त्यांनी भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला समानतेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देऊन भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशातील दुर्बल घटकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून राजकीय शास्त्रज्ञ राघवेंद्र राव यांच्या मते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार हे उदारमतवादावर आधारित आहे. त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक व राजकीय बदल घडविण्याचा प्रयत्न केला.
आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एक प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व होते. यांच्या मते, तुमची तुमच्या ध्येयाच्या पावित्र्यावर अटळ निष्ठा असली पाहिजे. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांची सेवा करण्यासाठी कर्तव्यपूर्ती हेतूने जे लोक आत्मप्रेरित होतात ते धन्य होत. तुमचे ध्येय उच्च, उदात्त आणि महान आहे आणि तुमचा दृष्टिकोन तेजस्वी व गौरवशाली आहे. जे आपला वेळ, बुद्धी व आपले सर्वस्व गुलामीच्या निदर्शनासाठी पणाला लावतात ते धन्य होत. जे गुलामगिरीत जखडलेल्यांना स्वतंत्र करण्यासाठी महान संकटे, हृदयविदारक मानहानी, वादळे आणि धोक्याची पर्वा न करता, जोपर्यंत पददलित जनतेला आपले मानवी अधिकार प्राप्त होत नाहीत, तो पर्यंत संघर्ष करीत राहतात. या त्यांच्या विचाराचे आजच्या महापरिनिर्वाण दिनी दादरच्या चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करावे. समाजसुधारक म्हणून त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलित समाजाची दुरवस्था पाहून चिंता वाटत होती. त्याचा अभ्यास केल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांतिकारी विचारधारा लोकांच्या संघर्षांचे नेतृत्व करत होती.
यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक राजकीय तत्त्वज्ञानी म्हणून उदयास आले. आपल्या देशाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून दलित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी अशिक्षित भारतीयांना राजकीय दडपशाही विरुद्ध प्रभावीपणे एकत्र केले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलित चळवळीतील एक महत्त्वपूर्ण राजकीय तत्त्वज्ञानी म्हणून ओळखले जातात.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय तत्त्वज्ञान हे सामाजिक लोकशाहीचा पाया आहे. कारण राजकीय लोकशाहीचा आधार सामाजिक लोकशाहीत असल्याशिवाय टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाही जीवनपद्धती समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही जीवनाची तत्त्वे त्यांनी संविधान सभेला संबोधित करताना सभागृहात स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन असून त्यांच्या लिखाणात व भाषणात तर्काची भूमिका दिसून येते. हितसंबंध कायद्याद्वारे सुरक्षित नसून समाजाच्या सामाजिक आणि नैतिक चेतनेद्वारे सुरक्षित केले जातात आणि सरकारची लोकशाही म्हणजे लोकशाही समाज म्हणजे लोकशाहीचा एक प्रकारचा समुदाय किंवा संबंधित जीवन पद्धती म्हणून त्यांचे मत होते. तसेच, सुसंस्कृत, स्वातंत्र्याचे रहस्य हे सामाजिक संबंध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक उदारमतवादी लोकशाहीवादी होते. लोकशाही तत्त्वज्ञानाचे अनन्यसाधारण योगदान सामाजिक लोकशाहीच्या कल्पनेसह समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्त्वाचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा मूलभूत आधार ओळखला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय तत्त्वज्ञानाची आपल्यापासून सुरुवात केली. आपल्या समाजासाठी वकिली करण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला. २० जुलै १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन करून समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. २० मार्च १९२७ रोजी महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे यासाठी सत्याग्रह केला.
२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. २० मार्च १९३० रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली मंदिराबाहेर मोठे आंदोलन केले होते. भारतीय संस्कृतीतील त्यांच्या कार्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक प्रभावशाली विचारवंत बनले. तेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान समजून घेणे ही आजच्या काळाची खरी
गरज आहे.