Friday, December 5, 2025

इंदू मिलच्या जागेत महामानवाचे स्मारक प्रगतिपथावर

इंदू मिलच्या जागेत महामानवाचे स्मारक प्रगतिपथावर
प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्राची संरचनात्मक कामे पूर्ण मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेत आकाराला आले आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) १२ एकर जागेत एक हजार ०८९ कोटी रुपये खर्चून हे स्मारक साकारले जात आहे. या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची शंभर टक्के स्ट्रक्चरल कामे झाली आहेत. सध्या अंतर्गत सजावटीची कामे प्रगतिपथावर असून, बाह्य विकासाची कामेही सुरू आहेत. त्यामुळे वर्षभरात हे दिमाखदार स्मारक खुले होणार आहे. डॉ. बाबासाहेब यांनी दिलेला समतेचा संदेश जगभरात पोहोचावा, त्यांचे अनमोल कार्य, कायद्याचा अभ्यास, बहुजनांसाठी हक्कासाठी दिलेला लढा आदी बाबींची पुढील पिढ्यांना माहिती व्हावी, त्याचा अभ्यास करता यावा म्हणून राज्य सरकारने इंदू मिलच्या १२ एकर जागेवर ४५० फूट उंचीचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २०१५मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. शंभर फूट उंचीचा विस्तीर्ण चौथरा असून, त्याच्या मध्यभागी चैत्य हॉल, लायब्ररी, म्युझियम, विश्रांतिगृह अशा वेगवेगळ्या सुविधा असणार आहेत, तर त्यावर बाबासाहेबांचा ३५० फूट उंचीचा ब्रॉझचा पूर्णाकृती पुतळा असणार आहे. त्यापैकी स्मारकातील सहाय्यभूत इमारतींची संरचनात्मक कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर अंतर्गत सजावट आणि बाह्य विकासाची कामे सुरू असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पुतळ्याच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण शंभर फूट उंचीच्या स्मारक इमारतीच्या विस्तीर्ण चौथऱ्यावर ३५० फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य धातूचे आवरण असलेला पुतळा उभारला जाणार आहे. पुतळ्याच्या पायथ्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. पुतळ्याच्या आर्मेचर फॅब्रिकेशनचे काम सुरू असून, सहा हजार टन पोलाद लागणार आहे. त्यापैकी १,४०० टन पोलाद आले असून, ६५० टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले आहे. कांस्य धातूच्या आवरणाचे कामही सुरू असून, पुतळ्याच्या दोन्ही बुटांच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरील शिलाई, लेस हुबेहूब दिसत आहे. दृष्टिक्षेपातील स्मारक - १२ एकर जागेत विस्तीर्ण स्मारक - स्मारकाची उंची ४५० फूट, तर पुतळ्याची उंची ३५० फूट - १,०८९ कोटी रुपये एकूण खर्च - पुतळ्याचे वजन सहा हजार मेट्रिक टन - पुतळ्यावरील ब्रॉझचे आवरण ८७० मेट्रिक टन - ४७० वाहनांसाठी दुमजली बेसमेंट पार्किंग
Comments
Add Comment