डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अर्थ विशेष - खरच आपल्याला संपूर्णपणे बाबासाहेब कळलेत? कृपया त्यांना मर्यादित करू नका !

मोहित सोमण


आज डॉ बाबासाहेब आंबेडकर ६९ वा महानिर्वाण दिन आहे. खरच समाजाला संपूर्णपणे बाबासाहेब आंबेडकर समजलेत का? त्यांचे संविधान आणि मूलभूत तत्वे या व्यतिरिक्त केलेले आर्थिक, सामाजिक परिवर्तन, अर्थव्यवस्थेवरील त्यांचा व्यासंग कळलय का? यावर कधी चर्चा होईल का? हा प्रमुख मुद्दा आहे. १९७० सालचा काळ त्या कालावधीत दलित समाजावर अन्याय अत्याचाराविरोधात बंडखोर तरूणांनी एकत्र येत दलित पँथरची निर्मिती केली.परंतु त्यामागे केवळ आक्रमक नाही तर सामंजस्याने तोडगा काढण्याचीही भूमिका होती. पँथरची आक्रमकता लोकांनी लक्षात घेतली पण त्यांचे परिवर्तनवादी विचार किती लोकांनी आत्मसात केले हा खरा कळीचा मुद्दा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत हेच झाले. एखाद्या जागतिक अर्थतज्ज्ञाला लाजवेल इतके मोठे अर्थव्यवस्थेवर काम डॉक्टरांनी केले. परंतु त्याचा संदर्भ ठराविक बुद्धीजीवी वर्ग वगळता किती लोकांनी स्विकारला हा संशोधनाचा विषय आहे.


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड अभ्यास अर्थशास्त्राचा केला होता. व्यापक अर्थशास्त्रातील संदर्भासहीत स्पष्टीकरणासह डॉक्टरांनी तरूण वयात अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी दि इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया आणि दि प्रॉब्लेम ऑफ द रुपी : इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्यूशन अशी जागतिक दर्जाची अर्थव्यवस्थेवर लिहिली आहेत. त्यांचा मायक्रो व मॅक्रो अर्थव्यवस्थेवर दांडगा अभ्यास होता. विपुल लेखन करताना समाज तत्कालीन सामाजिक परिस्थिती, तत्कालीन अर्थसंदर्भ, भविष्यवादी अर्थव्यवस्था यांची सांगड घालत यावर विशाल लेखन त्यांनी केले.


खूप कमी जणांना माहिती असेल की देशातील सर्वात मोठे अर्थतज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉ अमर्त्य सेन हे डॉ आंबेडकरांना अर्थशास्त्रातील आपले गुरु मानतात यातच सगळं आलं! एक ब्रेडवर दिवसरात्र अभ्यास करत उच्चविद्याविभूषित झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ एका समाजाचे नेते म्हणून संबोधित करणे हे योग्य नाही ते भारतीयांचे नेते होते त्याहूनही ते देशाचे सु़धारक होते.


त्यासाठी आणखी एक पार्श्वभूमी महत्वाची ठरली. परदेशी शिक्षणासाठी गेल्यानंतर बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात डबल एम.ए. पीएच.डी. आणि लंडन विद्यापीठातून (सध्याच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स) एमएससी डी.एस्सी या पदव्या मिळवल्या होत्या. अर्थशास्त्रामध्ये पीएच.डी. आणि अर्थशास्त्रामध्ये दोनदा डबल डॉक्टरेट मिळवणारे डॉ. आंबेडकर हे पहिले भारतीय व पहिले दक्षिण आशियाई व्यक्ती झाले. विशेष म्हणजे डी.एस्सी ही डॉक्टरेट पदवी मिळवणारे बाबासाहेब हे पहिले व्यक्ती आहेत तसेच डी.एस्सी. पदवी लंडन विद्यापीठातून मिळवणारे आतापर्यंतचे एकमेव भारतीय झाले.


ब्रिटिश कालखंडातील प्रादेशिक वित्तीय व्यवस्थेचा विकास (दि इव्हॉल्युशन ऑफ प्रोविन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया) हा त्यांच्या "पीएच.डी.चा विषय होता. ज्यांना डॉक्टरांचे मार्गदर्शक म्हटलं जातं ते अर्थशास्त्रज्ञ प्रा. सेलिगमन यांनी डॉक्टरांच्या प्रस्तावनेत लिहिलेय की डॉ. 'आंबेडकरांचा प्रबंध वस्तुनिष्ठ असून आणि त्यांच्या स्वतःच्या देशात घडून येत असलेल्या महत्त्वपूर्ण स्थित्यतरांचे (घटनांचे) निःपक्षपाती विश्‍लेषण त्यात आहे. त्यांच्या अभ्यासातून निघणारे निष्कर्ष हे इतर देशांनाही लागू होणारे आहेत.'


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या एकूणच अभ्यासातील प्रथम विषय हा अर्थशास्त्रच होता. परंतु दुर्दैवाने त्याचा उल्लेख अग्रक्रमाने अद्याप केला जात नाही. भारतातील पुराण काळातील समृद्धी,भेदभाव, वाढणारी विषमता, परकीयांचा विस्तारवादी आर्थिक दृष्टीकोन, भारताची आगामी झेप अशा अनेक गोष्टीवर डॉक्टरांनी विस्तृत लिहिलेले आहे. खरं तर त्यांचे प्रबंध आज पाठ्यपुस्तकात असण्याची गरज आहे. अद्याप त्यांचा उल्लेख केवळ घटनेचे शिल्पकार म्हणून करत त्यांना मर्यादित करण्याचा प्रयत्न करत आहोत असे वाटते. त्यामुळे त्यांना मर्यादित करणे हे त्यांच्या विचारांचा अपमान ठरेल.


भूमिहीन मजूर, लहान जमिनी, खोतीपद्धती, महारवतन, सामुदायिक शेती, जमीन महसूल आणि जमीनदारशाहीचे उच्चाटन या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले. खासकरुन हुकूमशाही व सामंतशाही या कालावधीनंतर नव्या काळातही अस्पृश्य समाजात केवळ बहुतांश भूमिहीन मजुरांचाच भरणा अधिक होता. उत्पन्नाचा आवश्यक स्त्रोत नसल्याने सरकार दरबारी काय उपाययोजना केली पाहिजे याची माहिती डॉक्टरांनी आपल्या प्रबंधनात दिली होती. उद्योगांचे राष्ट्रीयीकरण, सर्वसामान्यांचे आर्थिक प्रश्न, अर्थकारणाची उत्क्रांती, धान्याचा प्रश्न, समाजवाद, सामाजिक समता या विषयांवरही त्यांनी प्रासंगिक लिखाण केले होते.विद्यापीठात असताना पदवी परीक्षेसाठी त्यांनी जे प्रबंध लिहिले यात त्या मुद्यांच्या प्रकर्षानं आढळतो.


आरपीआय स्थापन करण्यापूर्वी स्वतंत्र मजूर पक्ष, अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्षाची पायाभरणी त्यातूनच झाली. तत्कालीन सामाजिक विषयाचे अभ्यासक म्हणतात,'निवडणुकीच्या वेळचे जाहीरनामे आणि भारतीय घटनेवरील भाषणात त्यांनी अर्थाचे विकेंद्रीकरण, राष्ट्रीयकरण, आर्थिक समता, व औद्योगिक विकास या विषयावर भर दिला होता.त्यांच्या लेखणीतून जमीनीचे प्रश्न चलनविषयक प्रश्न, सार्वजनिक प्रश्न असे विभागले गेले होते.


ब्रिटिश सरकारला १९४७ साली त्यांनी भारताच्या आर्थिक विकासाची योग्य धोरणे कोणती हे सांगितले होते. अत्युच्च उत्पादन क्षमतेचा विचार करून लोकांच्या आर्थिक जीवनाचे नियोजन करणे तसेच खासगी उत्पादकांना कोणतीही आडकाठी न करता आणि संपत्तीचे समान वाटप होईल अशारीतीने आर्थिक नियोजन करणे हे सरकारचे दायित्व आहे असे त्यांनी नमूद केले होते. डॉ. आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार, 'आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक धोरण आणि कार्यक्रम हे राज्य घटनेचे अविभाज्य भाग असले पाहिजेत' दुर्दैवाने अर्थकारणापेक्षा राजकारणाला या देशात अधिक महत्व आहे.


प्राथमिक साधनांचे खासकरून शेतीचे मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण, प्रत्येक नागरिकासाठी सक्तीची विमा योजना आणि आर्थिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी खासगी उद्योजकांना वाव देण्याच्या आवश्‍यकतेचा अंतर्भाव असायला हवा असे आंबेडकर म्हणत कसत. म्हणूनच हे कार्यक्रम शाश्‍वत होण्यासाठी त्यांना राज्य घटनेत मूलभूत गोष्टींचा दर्जा असायला हवा यासाठी त्यांनी केवळ पुस्तकी नाही तर प्रत्यक्ष अर्थकारणाची तिजोरी सरकारने कश्या प्रकारे उपयोगात आणली पाहिजे यासाठी संविधानात विशेष तरतूद केली आहे. त्यांच्या मते या तरतुदीमुंळे राज्यकर्त्यांना नैतिक जबाबदारी पार पाडणे आवश्यक असेल. अशा कार्यक्रमांना विरोध असलेला राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी त्याला हे कार्यक्रम रद्द करता येणार नाहीत. या योजनेला डॉ. आंबेडकरांनी 'घटनात्मक शासकीय समाजवाद' (कॉन्स्टिट्युशनल स्टेट सोशॅलिझम) असे नाव दिले होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर सत्याची कास धरली. यापूर्वी पुढाऱ्यांनी त्यांचा कायम राजकारणासाठी उपयोग केला. राजकारण सुधारण्यासाठी त्यांनी शासकीय परिचलनात अर्थशास्त्रीय व्याख्या वापरण्यास सुरुवात केली ज्याचा फायदा आजतागायत जागतिकीकरणानंतरही होत आहे.


आज रुपयात मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू आहे. पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२३ मध्ये रूपयाची गंभीर दखल घेतली होती. मार्च १९२३ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या प्रतिष्ठित संस्थेत द प्रोब्लेम ऑफ रूपी नावाचा २५१ पानांचा शोध प्रबंध सादर केला होता. आंबेडकरांनी भारताच्या राष्ट्रीय चलनाशी व रुपयाशी संबंधित समस्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न या प्रबंधातून केला होता. औद्योगिक क्षेत्रातील विकासालर लिहिताना कारखान्यातील उत्पादनांचा व्यापार सुलभ करण्यासाठी विनिमय दर खूप जास्त ठेवण्याच्या ब्रिटिश डावपेचाविरुद्ध त्यांनी त्या कालावधीत युक्तिवाद केला होता.


उपलब्ध माहितीनुसार, याच १९२३ सालात त्यांनी अर्थशास्त्रात २९ इतिहासात ११, समाजशास्त्रात सहा, तत्वज्ञानात पाच, मानववंशशास्त्रात चार, राज्यशास्त्रात तीन अभ्यासक्रम पूर्ण केले होते. याशिवाय, त्यांनी फ्रेंच आणि जर्मन भाषेत प्रत्येकी एक प्राथमिक अभ्यासक्रम देखील घेतला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मधून विज्ञानात डॉक्टरेट केली आणि ती त्यांना १९२३ मध्ये प्रदान करण्यात आली.


आंबेडकरांच्या मते, ब्रिटीश राजवटीच्या राजकोषीय धोरणांमध्ये न्यायाचा अभाव होता. कराचा भार श्रीमंतांऐवजी अधिक गरिबांवर पडला आणि सार्वजनिक खर्च हा उच्चभ्रूंच्या विशेषाधिकारांना आणि उघड उपभोगाला कायम ठेवण्यासाठी केंद्रित होता. म्हणजेच जमीनदार वर्ग आणि सरकारी अधिकाऱ्यांना सार्वजनिक कल्याणाऐवजी त्यांनी निदर्शनास आणून दिले की ब्रिटीशांच्या उधळपट्टी धोरणांमुळे आणि सदोष कर धोरणांमुळे, कर आकारणीचा पायाच या कारणास्तव ढासळत होता आणि महसूल संकलनातील तूट होण्याचे हे एक प्रमुख कारण होते. त्यासाठी त्यांनी हे बदल करण्यासाठी राजकारणात प्रवेश घेतला असला तरी त्यांची राजकीय कारकीर्द पाहता त्यांनी सत्याची कास सोडली नाही.


काँग्रेस चळवळीतील अनेक मतभेद असतानाही तत्कालीन सामाजिक स्थितीचा आढावा घेत दुरदृष्टीने त्यांनी प्रथम राष्ट्रीय व सामाजिक, आर्थिक न्याय यांची कास कधी सोडली नाही. आज त्यांचे स्मरण जयंती अथवा मी महानिर्वाण दिनी होते पण त्यांचे एकूणच सामाजिक काम आभाळाएवढे होते त्यामुळे डॉक्टरांविषयी बोलताना निश्चितच वाटते की डॉक्टरांची न्यायी वृत्ती व आर्थिक दुरदृष्टी पाहता समाजाला यामध्ये खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांचा व्यासंग अफाट होता. त्यामुळे त्यांच्या विचारांचे आचरण करण्यासाठी प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर समजून घेतले पाहिजे त्यासाठी गत्यंतर नाही.


समाजात आज गरज आहे ती समानतेची, बदललेल्या अर्थकारणाला सामोरे जात सकारात्मक होण्याची, ती गरज नक्कीच डॉक्टरांच्या प्रबंध वाचनानंतर मिळेल. तूर्तास या महामानवाला कोटी कोटी प्रणाम व अभिवादन!

Comments
Add Comment

राजकीय तत्त्वज्ञानी

रवींद्र तांबे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६९ वा महापरिनिर्वाण दिन. १४

मतमोजणी पुढे ढकलल्याने राजकीय वर्तुळात नाराजी

अविनाश पाठक मतमोजणी १९ दिवस पुढे ढकलली गेल्यामुळे सर्व ठिकाणच्या ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये बंद झालेल्या

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप, तरुण कलाकारांसाठी सुवर्णसंधी

सुरेश वांदिले भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, रंगमंच, दृष्यकला, लोककला, पारंपरिक आणि देशी कला, सुगम

शहरे महाग, जनता गरीब!

कैलास ठोळे आज आर्थिक अडचणींमुळे कुटुंबांना निव्वळ जगण्यासाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. शहरी गरिबांचे जीवन

राष्ट्रवादीच्या ग्रामीण ताकदीसमोर भाजपचे आव्हान

धनंजय बोडके - उत्तर महाराष्ट्र नगर परिषदांच्या रणधुमाळीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मोठी राजकीय हालचाल

सार्वजनिक ठिकाणी रोमान्स ठरू शकतो कायदेशीर गुन्हा

मीनाक्षी जगदाळे भारतात कारमध्ये, सार्वजनिक ठिकाणी किंवा जवळपास कुठेही पार्किंग करून सेक्स किंवा रोमांस करणे