Saturday, December 6, 2025

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला जातो. अनेकजण आपल्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ अशा पद्धतीने अपलोड करतात की जणू ते कोणत्या कमर्शियल शो चा भाग आहेत. पालकांना यामुळे आर्थिक फायदा मिळत असला, तरी या प्रक्रियेमुळे मुलांच्या निरागस बालपणावर गदा येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्यसभेच्या सदस्य सुधा मूर्ती यांनी या ट्रेंडवर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी केंद्र सरकारने अशा प्रकारे मुलांचा सोशल मीडिया कंटेंट म्हणून वापर करून पैसे कमावणाऱ्यांविरोधात नियम तयार करावेत, अशी मागणी केली, जेणेकरून देशाचं भविष्य असलेल्या मुलांचं रक्षण होईल. हा मुद्दा मांडताना त्यांनी फ्रान्ससह इतर विकसित देशांमधील बालकांच्या कायद्यांचा उल्लेख केला. सुधा मूर्ती म्हणाल्या, “मुलं आपलं भविष्य आहेत. त्यांना चांगलं मूलभूत शिक्षण, खेळ आणि विविध उपक्रमांत प्रतिभा विकसित करण्याची संधी मिळायला हवी.”

इंटरनेटवर फॉलोअर्स वाढवण्याची स्पर्धा

सुधा मूर्ती म्हणाल्या, “सोशल मीडिया आज अत्यंत लोकप्रिय झाला असला, तरी त्याचे काही नकारात्मक परिणामही आहेत.” फॉलोअर्स वाढवण्याच्या धडपडीत अनेक पालक आपल्या लहान मुलांचे वेगवेगळ्या वेशभूषेत,फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करतात, , जेणेकरून त्यांच्या १० हजार, ५ लाख किंवा १० लाख फॉलोअर्सपर्यंत संख्या वाढेल. मला माहित आहे की यामुळे पालकांना आर्थिक लाभ मिळतो; पण याचा मुलांच्या मनोवृत्तीवर दीर्घकालीन परिणाम होतो

सुधा मूर्ती पुढे म्हणाल्या की , वेळेत नियम न केल्यास पुढील काळात मुलांसाठी मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. “या प्रक्रियेमुळे मुलं आपली निरागसता गमावतील. त्यांच्या मानसिक विकासावर परिणाम होईल. ते सामाजिक उपक्रम, खेळ किंवा व्यवस्थित शिक्षणाची पद्धत शिकू शकणार नाहीत,”

अ‍ॅड्स आणि चित्रपट क्षेत्रात मुलांच्या सहभागावर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्र सरकारच्या उपायांचे कौतुक करत , जाहिराती, चित्रपटातील बालकलाकार यांसाठी कडक नियम आहेतच पण इंटरनेट प्लॅटफॉर्मवर अशा नियंत्रणाची गरज आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा