Friday, December 5, 2025

अतिरिक्त आयुक्त डॉ ढाकणे यांच्याकडे मालमत्ता विभागासह पर्यावरणाचीही जबाबदारी

अतिरिक्त आयुक्त डॉ ढाकणे यांच्याकडे मालमत्ता विभागासह पर्यावरणाचीही जबाबदारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी डॉ अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. डॉ ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे)पदाचा भार सोपवण्यात आला असून यापूर्वीच्या तुलनेत ढाकणे यांच्याकडे मालमत्ता खाते, उपप्रमुख अभियंता (सुधार) आणि पर्यावरण या अतिरिक्त विभाग तथा खात्यांचा भार सोपवण्यात आला आहे. पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचा भार अतिरिक्त आयुक्त (शहर)डॉ अश्विनी जोशी आणि मालमत्ता खाते आणि उपप्रमुख अभियंता सुधार विभागाचा भार अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ विपीन शर्मा यांच्याकडे होते. तर अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्याकडील अग्निशमन दल हे डॉ अश्विनी जोशी आणि नगर अभियंता तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी डॉ विपीन शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ अविनाश ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरे यांच्याकडे असलेल्या पूर्वीच्या पदभारा व्यतिरिक्त मालमत्ता खाते, कर्मचाऱ्यांना निवासस्थानाचे वाटप, उपप्रमुख अभियंता (सुधार) यांच्याशी संबंधित कामकाज, तसेच पर्यावरण अभियांत्रिकी संबंधिचे कामकाज आदीची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडील अग्निशमन दल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचा पदभार कमी करण्यात आला आहे.

अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे)यांच्याकडील मालमत्ता विभागाचा पदभार कमी करताना प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण), माहिती तंत्रज्ञान उपयोग व सुधारण तसेच महापालिका संगणीकरणाबाबतच्या बाबी या दोन विभागांचा भार सोपवण्यात आला आहे, तर अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ अश्विनी जोशी यांच्याकडील पर्यावरण विभागाचा भार कमी करतानाच त्यांच्याकडे जुन्या पदभारा व्यतिरिक्त अग्निशमन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्याकडील खाते तथा विभागांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा